एपी, वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांचे बहुतांश कल हाती आले असून रिपब्लिकन पक्षाची ‘नाट’ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार १०० सदस्यांच्या सेनेटमध्ये दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ४८ जागांवर वर्चस्व मिळवले आहे. मात्र चार जागांवर अटीतटीची लढत असून या निकालावरच पुढील दोन वर्षे सेनेट कुणाच्या ताब्यात असणार हे स्पष्ट होईल.
जॉर्जिया, विस्कॉन्सिन, अॅरिझोना आणि नवादा या चार राज्यांमधील सेनेटचे कल अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. यापैकी दोन जागांवर रिपब्लिकन आणि दोन जागांवर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आघाडीवर असले तरी ही आघाडी अत्यल्प आहे. मात्र पेनसिल्वेनियाची जागा जॉन फेटरमन यांनी रिपब्लिकन पक्षाकडून खेचल्यामुळे डेमोक्रेटिक पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. अनेक डेमोक्रेटिक विद्यमान सेनेट सदस्यांनी पक्षाच्या अपेक्षेला छेद देत आपली जागा राखली आहे. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर डेमोक्रेटिक पक्ष ‘अल्पमतात’ जाण्याची शक्यता अद्याप असली तरी त्यांचे अपेक्षेप्रमाणे संपूर्ण पानिपत झाले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या कनिष्ठ सभागृहात रिपब्लिकन पक्षाला माफक आघाडी मिळताना दिसत असली तरी कायदेमंडळावर (काँग्रेस) निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.
ही निवडणूक राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात होती. त्यांची घटलेली लोकप्रियता, जागतिक मंदीचे सावट, वाढती महागाई याचा सत्ताधारी पक्षांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. खुद्द डेमोक्रेटिक पक्षालाही विजयाची खात्री वाटत नसताना अमेरिकेच्या नागरिकांनी दिलेला हा कौल बायडेन प्रशासनासाठी प्राणवायू ठरणार आहे.
‘लोकशाही’साठी कौल?
बायडेन यांनी आपल्या प्रचारात ‘लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा’ असे आवाहन वारंवार केले होते. त्यांचा रोख अर्थातच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होता. अमेरिकेच्या मतदारांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालावरून दिसते आहे.
मिशिगनमध्ये मराठी झेंडा!
मूळचे मराठी असलेले डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार श्री. ठाणेदार यांनी अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांनी मिशिगन राज्यातील जागेवर रिपब्लिकन उमेदवार मार्टेल बिविंग्ज यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. मिशिगन राज्यातून ‘हाऊस’मध्ये जाणारे ठाणेदार हे पहिले, भारतीय वंशाचे नेते ठरले आहेत. तसेच राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल यांच्यानंतरचे ते चौथे भारतीय वंशाचे हाऊस सदस्य असतील. वडिलांच्या निधनानंतर बेळगावमध्ये काम करून शिक्षण पूर्ण केलेले ठाणेदार आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अमेरिकेत यशस्वी उद्योजक झाल्यानंतर आता ते राजकारणाचे मैदानही गाजवत आहेत.
ट्रम्प यांच्याकडे लक्ष
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२४ मध्ये अध्यक्षपदासाठी पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने मोठय़ा फरकाने विजय मिळवला असता तर त्यांना निश्चितपणे बळ मिळाले असते. या निकालापर्यंत त्यांनी आपली उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्याचे टाळले होते. रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्यामुळे आता ट्रम्प यांच्या भूमिकेकडे विरोधकांसह स्वपक्षीयांचेही लक्ष असेल.
‘सेनेट’साठी कौल
रिपब्लिकन ४८
डेमोक्रॅट ४८
अटीतटीची लढत ४
एकूण १००
बहुमत ५१ ‘हाऊस’साठी कौल
रिपब्लिकन १९९
डेमोक्रॅट १७८
एकूण ४३५
बहुमत २१८