पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे. ‘व्हीव्हीपॅट’संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घ्यायची असल्याचे रमेश यांनी या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.
या पत्रामध्ये रमेश यांनी लिहिले आहे की, ‘‘२० डिसेंबर २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी ‘व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि सूचना करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आदल्या दिवशी महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या आधारे ही चर्चा करायची आहे. आम्ही आमच्या ठरावाची प्रत सोपवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आतापर्यंत आम्हाला यश आलेले नाही,’’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी मतदान यंत्रांसंबंधी (ईव्हीएम) असलेल्या शंकांसंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना ९ ऑगस्ट २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते याकडे रमेश यांनी निर्देश केला.
हेही वाचा >>>चीनशी वास्तवाच्या आधारेच व्यवहार आवश्यक!
आमच्या निवेदनावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी २३ ऑगस्ट २०२३ रोजी आमच्या कायदेशीर सल्लागारांना स्पष्टीकरण दिले. हे स्पष्टीकरण सरसकट स्वरूपाची होती, अशी नाराजी रमेश यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘एफएक्यू’ पाहायला सांगण्यात आले; ‘लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ६१अ’द्वारे ‘ईव्हीएम’ला असणारा कायदेशीर आधार स्पष्ट करून सांगण्यात आला; या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ांचा सारांश देण्यात आला आणि २००४पासूनच्या निवडणुकींच्या निकालाचा तक्ता देण्यात आला. मात्र, आम्हाला बैठकीसाठी किंवा सुनावणीसाठी बोलावण्यात आले नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे.