पीटीआय, नवी दिल्ली
दररोज थोडा वेळ योगासने, सकाळी तसेच जेवण झाल्यावर चालणे याच्या मदतीने बोगद्यात १७ दिवस अडकून पडलेल्या मजुरांनी आपले मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य चांगले ठेवले. सुटका झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी या मजुरांनी बोगद्यातील परिस्थिती विषद केली. बोगद्याचा भाग कोसळला तो क्षण आणि नंतरचे पहिले ७० तास सर्वात आव्हानात्मक आणि कसोटी पाहणारे असल्याचे या मजुरांनी सांगितले.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम यात्रेच्या मार्गावरील सिलक्यारी येथे निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते. त्यानंतरचे १७ दिवस बोगद्याच्या आतमधील दोन किलोमीटरचा भाग हेच या मजुरांचे विश्व होते. २५ वर्षांच्या मनजित चौहान हा मजुर बोगदा कोसळला त्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणाला, ‘‘ढिगारा कोसळला तिथून मी केवळ १५ मीटर अंतरावर होतो. सुरूवातीला वाटले की मी स्वप्न बघत आहे आणि ते दुस्वप्न ठरलेच.. आम्ही सर्वजण घाबरलो होतो. उपासमार, घुसमट असे सगळे विचार मनात आले. सर्वजण हेच बोलत होते.’’ अन्य एका मजुराने सांगितले, की पहिले काही तास अत्यंत कठीण गेल्यानंतर बाहेरून गरमागरम आमटी-भात, पाण्याच्या बाटल्या आतमध्ये पाठविण्यात आल्यानंतर जिवात जीव आला.
हेही वाचा >>>पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे काही मजुरांशी संवाद साधला. यावेळी तब्येत चांगली ठेवण्यासाठी योगासने व मॉर्निग वॉकची मदत झाल्याचे बिहारच्या साबा अहमद याने पंतप्रधानांना सांगितले. या १७ दिवसांच्या काळात सर्व मजूर एकमेकांचे चांगले मित्र झाल्याचाही उल्लेख अहमदने केला. उत्तराखंडच्या गब्बरसिंह नेगी याने पंतप्रधान मोदी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, कंत्राटदार कंपनी तसेच बचाव पथकांचे आभार मानले.
डोंगरातील पाणी, पोह्यांवर भिस्त
बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर पहिले ७० तास सर्वात कठीण गेल्याचे २२ वर्षिय अनिल बेडिया या मजुराने सांगितले. तहान भागविण्यासाठी डोंगरातून झिरपणारे पाणी पिण्याचा सल्ला दोन वरिष्ठांनी दिल्याचे तो म्हणाला. या काळात जवळ असलेल्या पोह्यांवर भिस्त होती. मात्र नंतर बाहेरून मदत येण्यास सुरूवात झाली व धीर मिळाल्याचे अनिलने नमूद केले.