गेल्या आठवडय़ात उत्तराखंडला तडाखा देणारा भीषण जलप्रपातातून सावरण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आह़े  खराब हवामानामुळे रविवारी पहाटे काही काळासाठी थांबविण्यात आलेले उत्तराखंडमधील बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले आह़े  हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून या भागात पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्यामुळे उंच ठिकाणी अडकलेल्या २२ हजार पर्यटकांना वाचविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा पुन्हा एकदा युद्ध पातळीवर कामाला लागली आह़े.
पाऊस आणि पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी यसा जिल्ह्यांतून आतापर्यंत सुमारे ७० हजार भाविकांची सुटका करण्यात आली आह़े  केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही प्रसिद्ध मंदिरे याच जिल्ह्यांत आहेत़
४० हून अधिक हॅलिकॉप्टर आणि १० हजारांहून अधिक लष्करी आणि निमलष्करी दलाचे जवान बचावकार्यात सहभागी झाले आहेत़  देहराडून आणि जोशीमठ येथे पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे रविवारी पहाटे येथील बचावकार्य सुरू होण्यात अडथळे आल़े  मात्र तासाभरातच हवामान स्वच्छ झाल्यामुळे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े  तसेच सोमवारी मोठय़ा पावसाची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्यात आणखी वेग आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितल़े
बद्रीनाथजवळच्या ५० किमीच्या परिसरात पायवाट तयार करण्यात आल्या असून या वाटांनी अडकलेल्यांना सोडविण्याचे कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती भारत- तिबेट सीमा पोलीस(आयटीबीपी) दलाचे वरिष्ठ अधिकारी अमित प्रसाद यांनी गौचर येथे पत्रकारांना सांगितल़े  खराब हवामानामुळे हवाई मार्गाने सुरू असलेल्या बचावकार्यात व्यत्यय आल्यास, पर्याय म्हणून हे मार्ग तयार करण्यात येत असून, त्यासाठी आयटीबीपीचे सुमारे २०० जवान कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितल़े
रुद्रप्रयाग जिल्ह्यातील चट्टी या जंगलाच्या प्रदेशात सुमारे पाचशे यात्रेकरू अजूनही अडकले असल्याची शक्यता असून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही अमित प्रसाद यांनी सांगितल़े  केदरनाथजवळच्या गौरी गाव आणि रमबाडा या भागांत दोन हॅलिपॅड बांधण्यात आले आहेत़
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, केदारनाथ खोऱ्यातील सर्व यात्रेकरूंना बाहेर काढण्यात यश आले आह़े  त्यामुळे आता सर्व बचावकार्य बद्रीनाथ येथे केंद्रित करण्यात आले आह़े  या ठिकाणी ७ ते ८ हजार यात्रेकरू अद्यापही अडकले असण्याची शक्यता आह़े  त्यांना पुरेसे खाद्यपदार्थ आणि औषधे पुरविण्यात आली आहेत, असेही संबंधित सूत्रांनी सांगितल़े
शनिवारी केदारनाथ येथून १२३ मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याने मृतांची संख्या ६७३ झाली आह़े
राज्याच्या विविध भागांत सापडलेले मृतदेहांवर धार्मिक प्रथांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील़  तसेच मृतांच्या आत्म्यास सद्गती मिळावी यासाठी या दुर्घटनेच्या १३ व्या दिवशी हरिद्वार येथे ‘महायज्ञा’चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े  शनिवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि बहुगुणा हरिद्वार येथे संत समाजाला भेटले तेव्हा त्यांना यज्ञ करण्याचे सुचविण्यात आल़े
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बाधित क्षेत्राचा हवाई दौरा केल्यानंतर बहुगुणा यांची भेट घेतली़  या वेळी मोदी यांनी केदारनाथ मंदिराच्या पुनर्बाधणीसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिल़े
चिरंजीवी यांचे मदतीचे आवाहन
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री आणि सुप्रसिद्ध अभिनेते क़े चिरंजीवी यांनी, उत्तरखंड आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी  पुढे येण्याचे आवाहन रविवारी चाहते आणि आंध्रपदेशातील लोकांना केले आह़े  उत्तराखंड आपत्तीग्रस्तांसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनीही रविवारी ५ कोटी रुपयांची मदत  जाहीर केली आह़े  पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री व्ही़  नारायणस्वामी यांनी आपले एक महिन्याचे वेतन आणि खासदार निधीतून  दहा लाख रुपयांची मदत उत्तराखंड साहाय्यता निधीला करण्याची घोषणा केली आह़े
मदत छावण्यांच्या चित्रफिती काढण्याची मागणी
आठवडाभरापासून नातलगांचा ठावठिकाणा लागत नसल्याने वाट पाहून थकलेल्या आपत्तीग्रस्तांच्या जीवलगांनी अखेर शासकीय मदत छावण्यांतील लोकांच्या चित्रफिती काढण्याची आणि दाखविण्याची मागणी केली आह़े  गेल्या रविवारी झालेल्या जलप्रपातात अडकलेले २२ हजार लोक अद्यापही घरी परतलेले नाहीत़  त्यामुळे नातेवाईकांनी चित्रफितीच्या माध्यमातून आपल्या आप्तेष्टांना शोधण्याची इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रपतींकडून एका महिन्याचे वेतन
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उत्तराखंडच्या पुरबाधितांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याची  घोषणा केली आह़े  राष्ट्रपतींनी संबंधित विभागाला आपले महिन्याभराचे वेतन उत्तराखंडच्या मुख्यमंत्री  साहाय्यता निधीसाठी पाठविण्याचे आदेश दिले असल्याचे अधिकृत सूत्रांनी रविवारी सांगितल़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा