उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात ४० कामगारांच्या बचावासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगारा खोदकाम करण्यासाठी नवे यंत्रे बसवण्यात आली आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे.
बोगदा असलेल्या डोंगराची स्थिती नाजूक आहे. त्यापार्श्वभूमीवर नॉर्वे आणि थायलंडमधील तज्ञांचे मार्गदर्शन उत्तराखंड सरकारकडून घेतले जात आहे. बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह बोगद्याला भेट देणार आहेत.
ढिगाऱ्याकाळी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ९०० मिमी पाइप टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पाइपमध्ये ‘एक्सेप टनेल’ बसवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाइपमधून बाहेर येताना कामगारांना कुठल्याही प्रकाराचा त्रास होणार नाही.
दरम्यान, सिल्क्यरा बोगद्यात खोदकामासाठी बसवलेले यंत्रही नादुरुस्त झाले आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाची मदत घेतली जात आहे. दिल्लीहून मोठी यंत्रे हवाई दलाच्या मालवाहू विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आली. या यंत्रणांच्या साहाय्याने कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगवान होईल.