Uttarakhand tunnel Rescue updates : उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी पुन्हा अडथळा आला. त्यामुळे बचावकार्य पुन्हा थांबले असून मजुरांच्या सुटकेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, अडकलेल्या मजुरांची मानसिक अवस्था बिघडू नये याकरता त्यांना तिथं लुडो आणि पत्ते पाठवण्यात येणार आहेत. तसंच, अडकेलेल कामगार चोर पोलीस खेळत असल्याची माहितीही मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहित गोंदवाल यांनी पीटीआयला दिली. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बुधवारी रात्रभर अडथळा आल्यामुळे अनेक तास विलंब झालेली मोहीम गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू झाली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अडकलेल्या मजुरांशी संवादही साधला.बोगद्याच्या कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यातून ऑगर यंत्राचे खोदकाम सुरू असताना आणखी काही अडथळे न आल्यास ही मोहीम रात्रीतच संपवण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, पुन्हा आलेल्या अडथळ्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आशेला धक्का बसला.
हेही वाचा >> Uttarakhand Tunnel Rescue: मजुरांची सुटका लांबणीवर; बोगद्याचे खोदकाम पुन्हा थांबले
बचाव स्थळावरील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रोहित गोंदवाल यांनी पीटीआयला सांगितले की, “बचावकार्यात सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे बचावकार्य लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही अडकलेल्या कामगारांना ताणतणाव दूर करण्यासाठी लुडो, बुद्धिबळाचे बोर्ड आणि पत्ते पाठवणार आहोत. अडकलेल्या ४१ कामगारांची प्रकृती व्यवस्थित आहे. परंतु त्यांनी मानसिकदृष्ट्या सदृढ राहणेही गरजेचे आहे. त्यामुळे, तणाव कमी करण्यासाठी ते ‘चोर-पोलीस’ खेळतात, योगासने करतात आणि रोज व्यायाम करतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं.”
अडकलेल्या कामगारांच्या मानसिक आरोग्यावर बोलताना आणखी एका वैद्यकीय तज्ज्ञाने सांगितले की, त्यांचे मनोबल उंचावणे गरजेचे आहे. डॉक्टरांची एक टीम दररोज कामगारांशी बोलते आणि त्यांच्या आरोग्य आणि मानसिक स्थितीबद्दल माहिती घेते.
मजुरांसाठी सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी यंत्राद्वारे सुरू असलेल्या खोदकामाच्या मार्गातील लोखंडी तुळईचा अडथळा सकाळी हटवण्यात आला, असे घटनास्थळी हजर असलेले पंतप्रधान कार्यालयातील माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले. या अडथळय़ामुळे ५७ मीटर लांबीच्या ढिगाऱ्यातील खोदकामाला बुधवारी रात्री सहा तास उशीर झाला. ऑगर यंत्र जसजसे खोदकाम करेल, तसतसे ढिगाऱ्यातून स्टील पाइपचा एकेक तुकडा आत घुसवला जाणार आहे. तुकडा दुसऱ्या बाजूने बाहेर आला, की अडकलेल्या मजुरांना एकेक करून बाहेर काढले जाईल. या मजुरांना स्ट्रेचर्सवर झोपवून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.