पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठीच्या जगातील पहिल्या टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या असून, त्यात हे गर्भनिरोधक सुरक्षित व अत्यंत परिणामकारक असल्याचे, तसेच त्याचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) नसल्याचे दिसून आले आहे.या गर्भनिरोधकाच्या तिसऱ्या टप्प्यातील संशोधन चाचणीचे निष्कर्ष गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय ‘अँड्रॉलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले. २५ ते ४० वर्षांदरम्यानच्या ३०३ जणांवर या चाचण्या करण्यात आल्या.

 निरनिराळय़ा ठिकाणच्या रुग्णालयांमधील तिसऱ्या टप्प्याच्या संशोधन चाचण्या नवी दिल्ली, उधमपूर, लुधियाना, जयपूर व खडगपूर या पाच वेगवेगळय़ा केंद्रांवर घेण्यात आल्या. नवी दिल्ली येथील आयसीएमआरने त्यांचे संन्नवयन केले होते. भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) तिसऱ्या टप्प्यातील संशोधन चाचण्या घेण्यासाठी परवानगी दिली होती आणि संबंधित केंद्रांच्या संस्थात्मक नैतिक समित्यांनी त्याला मंजुरी दिली होती.या अभ्यासाचा भाग म्हणून, ३०३ निरोगी, लैंगिकदृष्टय़ा सक्रिय आणि विवाहित पुरुष व त्यांच्या निरोगी व लैंगिकदृष्टय़ा सक्रिय पत्नी, ज्या कुटुंबनियोजन क्लिनिकमध्ये, किंवा पुरुष नसबंदीसाठी आले होते, त्यांची निवड करण्यात आली होती. या पुरुषांना ६० मिलिग्रॅम ‘रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गायडन्स’ (आरआयएसयूजी) टोचण्यात आले.

हेही वाचा >>>“पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, अन्…”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा टोला

 ‘शुक्राणुहीनता (अझूस्पर्मिआ) साध्य करण्यासाठी आरआयएसयूजीची एकूण परिणामकारकता ९७.३ टक्के होती, तर गर्भधारणा प्रतिबंधावर आधारित ती ९९.०२ होती आणि त्याचे कुठलेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत’, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले. ‘गर्भनिरोधकांच्या विकासाच्या इतिहासात, पुरुष व महिला या दोन्ही प्रकारांतील इतर सर्व गर्भनिरोधकांच्या तुलनेत आरआयएसयूजीची परिणामकारकता सर्वाधिक आढळली’, असे या चाचण्यांच्या अहवालात म्हटले आहे. जगाची लोकसंख्या सतत वाढतच असताना, लोकसंख्या नियंत्रणासाठी पुरुष गर्भनिरोधकांच्या आधुनिक पद्धती विकसित करण्याची तातडीची गरज असल्याचेही मत या अभ्यासात व्यक्त करण्यात आले.पुरुष नसबंदी ही गर्भनिरोधक उपाययोजना म्हणून बरीच परिणामकारक असली, तरी या पद्धतीला असलेल्या काही मोठय़ा मर्यादांमुळे सुधारित तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली.

Story img Loader