निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सातत्याने नवनवे नियम लागू करणाऱ्या रिझर्व्ह बँकेवर बुधवारी काँग्रेसकडून खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही आता ‘रिव्हर्स बँक ऑफ इंडिया’ बनली आहे. नोटाबंदीनंतरच्या गेल्या ४३ दिवसांच्या काळात रिझर्व्ह बँकेने तब्बल १२६ वेळा नियम बदलले आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले. तत्पूर्वी बुधवारीही रिझर्व्ह बँकेकडून बँक व्यवहारासंदर्भात नवी सूचना जारी करण्यात आली. या सूचनेनुसार बँकेत पैसे जमा करण्यावर लादण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. १७ डिसेंबरला सरकारने राजपत्रित सूचना जारी करून जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटांमधील ५ हजारांपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार, असे आदेश दिले होते. तसेच ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही याचे स्पष्टीकरणही खातेधारकांकडून मागविले होते. मात्र, हा आदेश जारी करण्यात आल्यापासून याबाबत अनेक संभ्रम होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आज नवी सूचना जारी करून हे दोन्ही आदेश मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँक खात्यात ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येईल. तसेच ही रक्कम जमा करताना त्यांना बँक अधिकाऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरणही द्यावे लागणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा