कुंभमेळ्याहून परतणारे ३६ भाविक अलाहाबाद रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत कुंभमेळ्याचे व्यवस्थाप्रमुख आजम खान यांनी सोमवारी या पदाचा राजीनामा दिला.
केंद्रीय मंत्री असणाऱ्या खान यांच्यावर या कुंभमेळ्याच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रविवारी कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांची अलाहाबाद स्थानकात गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ३६ भाविकांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर खान यांनी सोमवारी ही जबाबदारी सोडली. ही दुर्घटना कुंभमेळ्यात घडली नाही, मात्र या घटनेमुळे मला अतिशय दुख झाले, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे व्यवस्थाप्रमुखपदाचा राजीनामा धाडला आहे. कुंभमेळ्यात सर्वोच्च सुविधा पुरविण्याचा मी प्रयत्न केला, असे ते म्हणाले. दरम्यान, या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीही अलाहाबाद स्थानकात गर्दीचे साम्राज्य होते. त्यात मृत व जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांनी अलाहाबाद स्थानक तसेच सरकारी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मृतांमध्ये वा जखमींमध्ये आपल्या कुटुंबातील कोणी आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी रेल्वे व सरकारी अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. या चेंगराचेंगरीत २२ जण दगावले, तर १४ जणांनी उपचारांदरम्यान प्राण गमावले, यातील २० जणांची ओळख पटली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.  
  चौकशी अहवालासाठी एक महिना
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती महिनाभरात या घटनेमागील कारणांचा शोध घेईल, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव जावेद उस्मानी यांनी दिली. ही समिती पुरेशी सक्षम असून न्यायालयीन चौकशीची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा