वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : ‘ट्विटर’चे नवे मालक जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायची की नाही हे ठरवण्यासाठी गुरुवापर्यंतची मुदत दिली होती. मात्र, मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांचे आगाऊ वेतन घेऊन कंपनीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खुद्द कंपनीच गोंधळल्याचे चित्र निर्माण झाले आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार मस्क यांनी दिलेल्या गुरुवारी ५ वाजेपर्यंतच्या मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात मस्क आणि त्यांचे काही सल्लागार यांनी कर्मचाऱ्यांच्या राजीनामासत्राची गंभीर दखल घेऊन त्यांना कंपनी सोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी बैठकाही घेतल्या. मस्क यांनी कंपनीच्या ‘दूरस्थ कार्यपद्धती’ धोरणा (रिमोट वर्क पॉलिसी) संदर्भात गोंधळ निर्माण करणारे काही ट्वीट संदेश प्रसारित केल्याने गोंधळात आणखी भर पडली, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
मस्क यांच्या सल्लागार चमूने कंपनी चालवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पण राजीनाम्याचा निर्णय न घेतलेल्या कर्मचाऱ्यांबरोबरही बैठक घेतली आणि त्यांनी राजीनामा देऊ नये यासाठी प्रयत्न केले. ‘‘कसे जिंकायचे हे मला माहीत आहे, आणि ज्यांना जिंकायचे आहे, त्यांनी माझ्याबरोबर यावे,’’ असे आवाहन मस्क यांनी बैठकीत केले. तसेच व्यवस्थापकांना इशारा देण्यापूर्वी दूरस्थ पद्धतीने काम करण्याबद्दलची आपली भूमिका मस्क यांनी सौम्य केल्याचे आढळले, असेही ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, मस्क यांनी ‘ट्विटर’च्या काही विदा (डेटा) सुरक्षा कार्यपद्धतींत बदल केल्यानंतर गेल्या आठवडय़ात ‘ट्विटर’च्या विदा सुरक्षा अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या सेनेट सदस्यांनी केंद्रीय व्यापार आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे. ‘ट्विटर’चे अंतर्गत मूल्यांकन आणि विदा सुरक्षा पद्धतींतील बदलांमुळे ग्राहकांची जोखीम वाढवली आहे, असे या सेनेट सदस्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
मस्क यांनी गेल्या महिन्यात ४४ अब्ज डॉलरचा व्यवहार करून ‘ट्विटर’ची मालकी घेतली. त्यानंतर त्यांनी ‘ट्विटर’च्या साडेसात हजार पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचारी कपात जाहीर केली. मस्क यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी हटवले आहे. कंपनीच्या यशासाठी कठोर मेहनत गरजेची असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मस्क यांनी ‘ट्विटर’च्या उर्वरित कर्मचाऱ्यांना ३६ तासांच्या आत ‘ट्विटर’ सोडण्याचा अथवा ‘ट्विटर’च्या दुसऱ्या पर्वास (ट्विटर २.०) यशस्वी करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन बुधवारी केले होते. जे ‘ट्विटर’ सोडण्याचा निर्णय घेतील त्यांना तीन महिन्यांचे वेतन मिळेल, असे त्यांनी जाहीर केले होते.
‘कंपनीबद्दल मला तीव्र चिंता नाही’
‘‘कसे जिंकायचे हे मला माहीत आहे, म्हणून ज्यांना जिंकायचे आहे, त्यांनी माझ्याबरोबर यावे,’’ असे आवाहन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना केले. चांगले लोक कंपनीत असल्यामुळे मला कंपनीच्या भविष्याबद्दल चिंता वाटत नाही. अभियंते फक्त कंपनी चालवण्यासाठी नसतात, तर बदल घडवण्यासाठी असतात, असेही मस्क यांनी एका वापरकर्त्यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले आहे.
कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह
एवढय़ा कमी कालावधीत मोठय़ा संख्येने कर्मचारीकपात केल्याने ‘ट्विटर’चे कामकाज प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने कसे चालेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मस्क यांनी आपल्या इतर कंपन्यांतून काही अभियंते आणि व्यवस्थापक ‘ट्विटर’मध्ये रुजू केले आहेत. मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपनी ‘टेस्ला’मधील काही कर्मचारी सध्या ‘ट्विटर’साठी काम करत आहेत.
सेनेट सदस्यांकडून चौकशीची मागणी
मस्क यांना ‘ट्विटर’च्या केवळ अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत आहे असे नाही. मस्क यांनी ‘ट्विटर’चा पदभार स्वीकारल्यापासून कंपनीने ग्राहक गोपनीयता कराराचे उल्लंघन केले अथवा नाही, याची चौकशी करण्याची मागणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सात ‘सेनेट’ सदस्यांनी गुरुवारी केंद्रीय व्यापार आयोगाकडे (फेडरल ट्रेड कमिशन) पत्राद्वारे केली आहे.