श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचा वाद संवादाच्या माध्यमातून आणि शांततामय मार्गाने सोडवला पाहिजे, या भूमिकेचा हुरियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुक यांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला. चार वर्षांच्या नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर त्यांचे हे पहिलेच जाहीर भाषण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन प्रश्नावर म्हटले होते की, आजचे जग हे युद्धाचे नाही. त्याचा संदर्भ देत मीरवाइज म्हणाले की, हेच वास्तव आहे.

हेही वाचा >>> लोकसभेत शिवीगाळ झालेल्या मुस्लीम खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट, भावूक होत बसपा नेते म्हणाले…

काश्मीरचे लोक समुदाय आणि राष्ट्रे यांच्यातील शांततामय सहजीवनावर विश्वास ठेवतात आणि त्यांनी नेहमीच काश्मिरी पंडितांनी परत येण्याचा पुरस्कार केला आहे, असेही मीरवाइज म्हणाले. ‘आम्ही आमच्या पंडित बंधूंना खोऱ्यात परतण्यासाठी नेहमीच आमंत्रण दिले आहे. हा राजकीय मुद्दा बनवणे आम्ही नेहमीच नाकारले आहे. हा मानवीय मुद्दा आहे’, असे त्यांनी सांगितले.

‘जम्मू-काश्मीरचा एक भाग भारतात, दुसरा पाकिस्तानात व तिसरा चीनमध्ये असल्याची आमची भूमिका आहे. हे सर्व मिळून, ऑगस्ट १९४७ मध्ये अस्तित्वात असलेले जम्मू-काश्मीर बनते. लोकांना विभाजित करण्यात आले असून, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायही मान्य करेल अशा रीतीने सोडवणे आवश्यक असल्याची वस्तुस्थिती आहे’, असे मीरवाइज यांनी येथील ऐतिहासिक जामा मशिदीत केलेल्या भाषणात सांगितले.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त १४ टक्के महिला; न्यायालय, पोलिस दल आणि इतर क्षेत्रात प्रमाण किती?

भारत व पाकिस्तानदरम्यानच्या विभाजन रेषेमुळे अनेक कुटुंबे विभक्त झाली असून, आनंद व दु:ख वाटून घेण्याकरिता एकमेकांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी ते उत्सुक आहेत. काही लोकांसाठी हा भौगोलिक मुद्दा असेल, पण जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी तो सर्वात महत्त्वाचा मानवी मुद्दा आहे, याचा मीरवाइज यांनी उल्लेख केला.

राजकीय पक्षांकडून सुटकेचे स्वागत

श्रीनगर : हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुक यांची साडेचार वर्षांच्या नजरकैदेनंतर सुटका करण्यात आल्याचे काश्मीरमधील राजकीय पक्षांनी शुक्रवारी स्वागत केले. २०१९ साली घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

मीरवाइज यांना खुलेपणाने फिरण्याची, लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या सामाजिक व धार्मिक जबाबदाऱ्या पुन्हा पार पाडण्याची मुभा देण्यात येईल, अशी आशा नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.