आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न हा किताब माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना का देण्यात आला नाही, असा सवाल भाजपने केला आहे. येत्या निवडणुकीनंतर आमचे सरकार आले तर आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न जाहीर करू, असे आश्वासनही पक्षाने दिले आहे.
भारतरत्न पुरस्कार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व वैज्ञानिक सीएनआर राव यांना देण्याचे जाहीर करण्यात आले. आम्ही त्यांचे स्वागतच करतो, पण आज आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न का देण्यात आले नाही, हा मुद्दा उपस्थित करीत आहोत.वाजपेयी यांनी छत्तीसगडची निर्मिती  केली. ते लोकप्रिय पंतप्रधान आहेत, असे राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
भारताचे पोलादी पुरुष सरदार पटेल यांनाही भारतरत्न मरणोत्तर का देण्यात आले, असा सवालही त्यांनी केला. सरदार पटेल हे रत्न होते व १९५० मध्ये त्यांचे निधन झाले व त्यांना १९९१ मध्ये भारतरत्न देण्यात आले. त्यांना भारतरत्न देण्यास ४१ वर्षे का लावण्यात आली. त्या दरम्यानच्या काळात जवाहरलाल नेहरू १७ वर्षे पंतप्रधान होते, इंदिरा गांधी १६ वर्षे पंतप्रधान होते व राजीव गांधी केवळ पाच वर्षे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्यासह अनेकांना भारतरत्न देण्यात आले तर पटेल यांना भारतरत्न देण्यास ४१ वर्षे का लावण्यात आली, असा सवाल त्यांनी केला.
भाजप हा चोरांचा पक्ष आहे, असे सांगणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की, असे असंसदीय शब्द त्यांचे आजी-आजोबा, वडीलही वापरत नव्हते. राहुल गांधी हे नेहरूंचे पणतू आहेत, इंदिराजींचे नातू तर राजीव यांचे पुत्र आहेत त्या कुणीही अशी असंसदीय भाषा विरोधी पक्षावर वापरली नव्हती. त्यांच्यापासून राहुल काय शिकले, असे ते म्हणाले.
रोजगारनिर्मितीत केंद्र सरकारच्या कामगार विभागाने छत्तीसगडला खालचा क्रमांक दिल्याबाबतच्या बातम्यांवर ते म्हणाले की, जेव्हा छत्तीसगडमध्ये लोक बेरोजगार आहेत असे म्हटले जाते तेव्हा राहुल गांधी यांनी गृहपाठ करावा.

Story img Loader