डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काशी हिंदू विद्यापीठातील आयुर्वेद विभागाच्या प्रमुखांनी एक कमी खर्चिक व सोपा उपाय शोधून काढला आहे. त्यांच्या मते ग्रीन टी ची रोपे लावल्याने डास पळून जातात.
आयुर्वेद विभागाचे प्रमुख के. एन. द्विवेदी यांनी ग्रीन टी च्या रोपांवर संशोधन केल्यानंतर असा दावा केला की, ग्रीन टी मुळे अतिशय घातक अशा डासांच्या प्रजातींपासूनही संरक्षण होते. या वनस्पतीच्या वासामुळे डास पळून जातात.
ग्रीन टी ही वनस्पती जुन्या काळापासून अस्तित्वात असून ती खेडय़ापाडय़ात सहज उपलब्ध आहे. या वनस्पतीचे विविध उपयोग मात्र लोकांना माहीत नाहीत. ज्या घराभोवती ग्रीन टी च्या वनस्पतींची लागवड आहे तेथे डास अजिबात फिरकत नाहीत असा दावा द्विवेदी यांनी केला आहे.
ग्रीन टी चा वास हा लिंबासारखा असतो, त्यामुळे मधमाशा व डास दोन्ही घराजवळ येत नाहीत. ही डासांना पळवण्याच्या वनौषधींवर आधारित पद्धत अतिशय स्वस्त अशी आहे. सध्या डासांना मारण्यासाठी जी औषधे उपलब्ध आहेत त्या बहुतांश औषधांमध्ये या वनस्पतीचा रस वापरलेला असतो. जर या वनस्पतीची पाने कुटून अंगाला लावली तर एकही डास तुमच्याकडे फिरकत नाही, असे द्विवेदी यांनी सांगितले.
 या वनस्पतीला आयुर्वेदात क्रित्रण म्हटले जाते व त्याचे शास्त्रीय नाव सिंबोपोगन स्कुलताश असे आहे.