आंध्र प्रदेशातील महामार्गावर आता चालकांसाठी विश्रामस्थाने
हैदराबाद- राज्यातील अपघातांचे प्रमाण करण्यासाठी आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १०० कि.मी. अंतरावर चालकांसाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी विश्रामस्थाने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर विश्रामस्थानांमध्ये पार्किंगची जागा, शौचालये, व्यापारी संकुले आदींचा समावेश करण्यात येणार असून चालकांना काही काळ विश्रांती घेता येणे शक्य होणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना करण्याचे ठरविले असून विश्रामस्थाने हा त्याचाच एक भाग असल्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी येथे रस्ते सुरक्षा परिषदेत स्पष्ट केले. रस्ते सुरक्षा निधीसाठी सरकार १० कोटी रुपये मंजूर करणार आहे.

उत्तर प्रदेशात माध्यान्ह भोजनातून ६४ विद्यार्थ्यांना विषबाधा
पीटीआय, लखनऊ
चिनहाट परिसरातील जुग्गौर येथील शासकीय प्राथनिक शाळेत माध्यान्हं भोजन घेतल्याने विषबाधा होऊन जवळपास ६४ विद्यार्थी आजारी पडले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माध्यान्हं भोजन घेतल्यानंतर विद्यार्थी आजारी पडण्याची लखनऊमधील गेल्या एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. माध्यान्हं भोजन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आणि अस्वस्थ वाटू लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती मिळताच तातडीने तेथे रुग्णवाहिका पाठविण्यात आली आणि विद्यार्थ्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे जिल्हा दंडाधिकारी राजशेखर यांनी सांगितले. डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर केवळ तीन विद्यार्थ्यांनाच रुग्णालयात दाखल करून घेतले. अन्य विद्यार्थ्यांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले.
तुर्कस्तानच्या १६ कामगारांचे बगदादमधून अपहरण
बगदाद- लष्कराच्या गणवेशातील बुरखाधारी इसमांनी बगदादमधून बुधवारी तुर्कस्तानच्या १६ कामगार आणि अभियंत्यांचे अपहरण करण्याची घटना घडली आहे. अपहरण करण्यात आलेल्या सर्वाना काही गाडय़ांमध्ये कोंबून अपहरणकर्ते पसार झाले, असे इराकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सद्र शहरातील एका क्रीडा संकुलाच्या कामाचे कंत्राट तुर्कस्तानमधील एका कंपनीला देण्यात आले होते आणि सदर १६ जण तेथे काम करीत होते. अपहरणकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन कामगार आणि अभियंत्यांचे अपहरण केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुर्कस्तानच्या १६ नागरिकांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला तेथील परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. याबाबत आम्ही इराकच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत, असेही तुर्कस्तानने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानात पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा
इस्लामाबाद- धार्मिक नेत्यांची हत्या करणाऱ्या आणि मुलींच्या शाळेवर हल्ला करणाऱ्या पाच जहाल दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अन्य एका दहशतवाद्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. पेशावरमधील शाळेवर दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर लष्करी न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
लाहोरमध्ये एका वकिलाची हत्या, क्वेट्टामध्ये धार्मिक नेत्यांची हत्या, गुदाब कराचीत पोलीस अधिकाऱ्यांची हत्या, बन्नू कारागृह फोडणाऱ्या, खैबरमध्ये मुलीच्या शाळेवर हल्ला आणि पोलिओ लसीकरण मोहीम राबविणाऱ्यांची हत्या करणाऱ्या पाच जहाल दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
सदर विशेष न्यायालयांचे कामकाज गोपनीय पद्धतीने होत असल्याने सुनावणीची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले नाही.

दिल्लीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
नवी दिल्ली – दिल्लीच्या दक्षिण भागातील वसंतकुंज परिसरातील मॉलजवळ असलेल्या वनक्षेत्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर अज्ञात व्यक्ती साधारणपणे २८ वर्षे वयोगटातील असून त्याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला ही बाब उघडकीस आली तेव्हा पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सदर व्यक्तीची ओळख पटावी अशी कोणतीही कागदपत्रे अथवा चिठ्ठी त्याच्या खिशात आढळली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader