पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मूसा या त्यांच्या मूळ गावी मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित या अकाऊंटवरुन सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा बदला घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या फेसबुक स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, “सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ”.
या पोस्टरमध्ये नीरज बवानाला टॅग करण्यात आलं आहे. नीरज बवानावर हत्या आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असून सध्या तिहार जेलमध्ये बंद आहे. याशिवाय जेलमध्ये असणारे त्याचे सहकारी टिल्लू ताजपुरिया आणि दविंदर भांबिया यांनाही टॅग करण्यात आलं आहे.
नीरज बवानाशी संबंधित ही पोस्ट कोणी लिहिली आहे हे नेमकं स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नीरजचे सहकारी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानभर पसरलेले आहेत.
हत्येप्रकरणी २४ तासांत पहिली अटक
हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी २४ तासांच्या आत पहिल्या आरोपीस अटक केली आहे. त्याला मन्सा येथील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव मनप्रितसिंग भाऊ असे असून त्याला अन्य पाच जणांसह देरहादून येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो फरिदकोटच्या धापुरी गावचा रहिवासी आहे. त्याचा चुलतभाऊ मनप्रितसिंग मुन्ना हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर गुंड कलबिर नरुना याच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. मनप्रितसिंग भाऊ याने मूसेवाला यांच्या मारेकऱ्यांना त्यांची माहिती पुरविल्याचा पोलिसांचा संशय आहे.