वृत्तसंस्था, नवी दिल्ली : किरकोळ महागाई दराने रिझव्र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग करत, सरलेल्या जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांवर, तीन महिन्यांच्या उच्चांकाला पोहोचल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर या आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.७२ टक्के पातळीवर होता. ती या दराची २०२२ सालातील नीचांकी पातळी होती. त्या आधी नोव्हेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ५.८८ टक्के नोंदविण्यात आला होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे जानेवारी २०२२ मध्ये तो ६.०१ टक्के नोंदला गेला होता, असे सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. अन्नधान्य घटकांसाठी महागाईचा दर जानेवारीमध्ये ५.९४ टक्के होता, जो डिसेंबरमधील ४.१९ टक्के पातळीवरून लक्षणीय उसळलेला दिसून आला. यापूर्वी अन्नधान्य महागाईने ऑक्टोबरमध्ये ६.७७ टक्के असा उच्चांक नोंदवला होता.
किरकोळ महागाई दराची पातळी रिझव्र्ह बँकेच्या दृष्टीने व्याजाचे दर ठरविताना महत्त्वाची ठरते. हा दर कमी-जास्त दोन टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांच्या मर्यादेत राखला जावा, याची जबाबदारी केंद्र सरकारने मध्यवर्ती बँकेवर सोपविली आहे. तथापि गेल्या वर्षी ऑक्टोबपर्यंत सलग नऊ महिने महागाई दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे, कायद्याने निर्धारित लक्ष्याच्या मर्यादेत राखण्यात अपयश आल्याने त्याची कारणमीमांसा लेखी स्वरूपात मध्यवर्ती बँकेला सरकारकडे करणे भाग ठरले होते. वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी रिझव्र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून १० महिन्यांत सहा वेळा एकूण अडीच टक्क्यांची व्याजदर वाढ (रेपो दर) केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या चालू वर्षांतील पहिल्या द्विमासिक आढावा बैठकीत रेपो दर पाव टक्क्यांनी वाढविण्यात आला असून, यापुढेही हे महागाईलक्ष्यी व्याजदर वाढीचे चक्र सुरू राहण्याचे संकेत रिझव्र्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले होते.
काय महागले?
सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार डाळी, दूध आणि अंडय़ांच्या दरांमधील वाढ कायम आहे. गतवर्षी जानेवारीच्या तुलनेत डाळींचे दर तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत, तर दूध व अंडी प्रत्येकी ८.८ टक्के महागली आहेत. भाज्यांचे दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी खाली आले आहेत.
व्याजदर आणखी वाढणार?
उत्पादनातील वाढत्या खर्चाचा परिणाम झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये महागाई दर चढाच राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा दर रिझव्र्ह बँकेच्या समाधान पातळीपेक्षा जास्त असल्यामुळे आगामी काळात व्याजदरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.