ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांनी सध्या राजकारण आणि न्यायालयांचे कामकाज यांची सरमिसळ होत असल्याचं मत व्यक्त केलं. “न्यायाधीश स्वतःला तटस्थ समजत असले, तरी त्यांच्याकडून राजकीय निवड होते,” असं स्पष्ट मत मुरलीधर यांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१४ सप्टेंबर) गौतम भाटिया यांचे पुस्तक ‘अनसिल्ड कव्हर्स : द डिकेड ऑफ द कॉन्स्टीट्युशन, द कोर्ट्स अँड द स्टेट’च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.
माजी न्यायमूर्ती एस. मुरलीधर म्हणाले, “न्यायाधीश कुठून येतात? गौतम यांचे पुस्तक न्यायाधीश निश्चित स्थानांवरून आले आहेत हे सांगतात. हे पुस्तक तुम्हाला सांगते की, कायदेशीर प्रश्न म्हणून अनेक राजकीय मुद्दे न्यायालयात येत आहेत. उदाहरणार्थ, हिजाब केस. आज (१४ सप्टेंबर) आपल्याकडे दोन बातम्या होत्या. यातील एक बातमी लक्षद्वीपमधील काय खावं याच्या निवडीबद्दलची आहे आणि दुसरी केरळमधील मंदिरात झेंडे फडकवण्याबद्दलची आहे.”
“न्यायाधीशांना ते तटस्थ आहेत असं वाटतं, मात्र…”
“न्यायाधीश राजकीय निवड करतात. न्यायाधीशांना ते तटस्थ आहेत असं वाटतं. मात्र, राजकारण आणि न्यायालयीन कामकाज आपल्याला हवे असते असे वेगळे नाहीत. त्यांची अधिकाधिक एकमेकांमध्ये सरमिसळ होत आहे,” असं मत माजी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : अदानींची समभाग व्यवहार लबाडी ‘सेबी’ने दडपली!; सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात याचिकाकर्त्यांचा दावा
“न्यायाधीशांना राजकीय निवड करण्यास भाग पाडलं जात आहे”
“आपण काय घालतो, काय खातो, काय बोलतो हे सर्व मुद्दे आता कायदेशीर आणि घटनात्मक मुद्दे बनत आहेत. अशा परिस्थितीत न्यायाधीशांना त्यातून निवड करणं आणि ती निवड सार्वजनिकपणे करायला भाग पाडलं जात आहे. या पुस्तकात न्यायाधीश नेमके कोठे उभे आहेत ते अगदी स्पष्टपणे लक्षात येते,” असंही मुरलीधर यांनी नमूद केलं.