उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये शनिवारी चोरी आणि खुनाची घटना घडली आहे. चोरांनी एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याचं घर लुटलं. यावेळी अधिकाऱ्याच्या पत्नीने चोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरांनी तिची गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही हादरून गेले. लूट आणि हत्येच्या या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आता या हत्येचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. या चोरी आणि हत्येच्या घटनेमागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायबरेलीसह उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहणारे, अलाहाबादचे माजी विभागीय आयुक्त तसेच सेवानिवृत्त आयएएस अधिकारी डी. एन. दुबे (७१) हे सध्या लखनौच्या इंदिरानगरमधील सेक्टर २२ मध्ये राहतात. शनिवारी सकाळी ते गोल्फ खेळून घरी परत आले आणि घराची अवस्था पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या घरातील सर्व सामान विखुरलं होतं. तसेच त्यांच्या पत्नी मोहिनी यांचा मृतदेह जमिनीवर पडला होता. मोहिनी यांच्या गळ्याला दोरी बांधलेली दिसत होती. घराची अवस्था आणि पत्नीचा मृतदेह पाहून दुबे हादरून गेले. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि लगेच पोलिसांना फोन करू या घटनेची माहिती दिली
डी. एन. दुबे यांच्या फोननंतर पोलिसांचं एक पथक, फॉरेन्सिकचं एक पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस आता दुबे यांच्या घराच्या आसपासचं आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. त्याचबरोबर दुबे यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. पोलिसांनी चोरी आणि हत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चोरांचा तपास घेत आहेत. यासह मोहिनी दुबे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
हे ही वाचा >> ‘जिंकणार तर भाजपाच, काँग्रेसला किती जागा?’ योगेंद्र यादव यांच्या अंदाजानंतर प्रशांत किशोर यांचा टोला
चोरीच्या उद्देशाने एक टोळी शनिवारी सकाळी निवृत्त आयएसएस अधिकारी डी. एन. दुबे यांच्या घरात घुसली होती. यावेळी दुबे यांच्या पत्नीने चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेने इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरी आणि हत्येच्या घटनेमुळे इंदिरानगर परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये लखनौमधील चोरीच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. अशातच आता इंदिरानगरसारख्या परिसरात एका माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली आहे. तसेच त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.