देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या पाचपैकी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांची निवडणूक भाजपाने जिंकली आहे. तर तेलंगणा हे राज्य काँग्रेसने बीआरएसकडून हिसकावलं आहे. यासह मिझोरम विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. झोरम पिपल्स मूव्हमेंटने मिझोरममध्ये सत्ता मिळवली आहे. पाचपैकी एकमेव तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण होणार हे देखील ठरलं आहे. रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सात डिसेंबर रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेस पक्ष कार्यालयाने रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. आज केवळ त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक झाली. तिथे सर्वानुमते रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे जन्मलेले ५४ वर्षीय रेवंत यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी असे आहे. उस्मानिया विद्यापीठातून पदवी मिळवताना त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून महाविद्यालयीन राजकारणात पाऊल ठेवले. २००६ साली त्यांनी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष निवडणूक लढविली आणि ती जिंकलीही. पुढच्याच वर्षी २००७ साली आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले. आंध्र प्रदेश विधान परिषदेत काम करताना तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रेड्डी यांच्यातले नेतृत्वगुण हेरून त्यांच्यासमोर टीडीपीमध्ये काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. २००९ साली रेड्डी यांनी टीडीपीच्या तिकिटावर कोंडगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे मातब्बर आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला.
रेवंत रेड्डी हे २०१४ मध्ये पुन्हा आमदार झाले. तसेच त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी बिनसले आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०१८ साली त्यांनी कोंडगल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली; मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१९ साली काँग्रेसने त्यांना मल्काजगिरी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (आता भारत राष्ट्र समिती) उमेदवाराचा पराभव करीत पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला. २०२१ साली ते तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष झाले. त्यानंतर त्यांनी तेलंगणात काँग्रेस पक्षसंघटना मजबूत केली. तेलंगणातील काँग्रेसच्या विजयात रेवंत रेड्डी यांचा मोठा वाटा आहे.