केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) कोविड व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सुधारित नियमावलीनुसार सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासांठी वापरण्यात येणाऱ्या अँटीपायरेटीक आणि अ‍ॅन्टी-टय़ुसिव्ह वगळता कोणतीही औषधे वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. खोकला आणि ताप कमी करण्यासाठी या औषधांचा वापर करण्यात येतो. दरम्यान, मंत्रालयाने वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधे वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट दिसत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. २७ मे रोजी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये डॉक्टरांनी सौम्य लक्षणांसाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोक्सीक्लोरोक्विन, इव्हर्मेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जस्त, मल्टीव्हिटॅमिन इत्यादी सर्व औषधे वापरण्यास मनाई केली आहे. तसेच या मार्गदर्शक तत्वांमध्ये विनाकारण सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक चाचण्या लिहून न देण्यास सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे

कोविड -१९ पासून संरक्षणासाठी योग्य मास्क, हातांची स्वच्छता आणि योग्य शारीरिक अंतर यांसारख्या गोष्टींवर भर देण्यास सांगितले आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या लोकांमध्ये कोविडची लक्षणे आढळली आहेत त्यांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह निरोगी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रूग्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी संपर्कात रहाण्यासाठी आणि फोन, व्हिडीओ-कॉल इत्यादी माध्यमातून सकारात्मक संवाद साधायला हवा असे सांगण्यात आलं आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर आवश्यक असल्यावरच औषधे देण्यात यावी असे मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये ताप येण्यासारख्या लक्षणांवर देखरेख करण्याची शिफारस मार्गदर्शक सूचनांमध्ये केली आहे.

करोनावरील उपचारांसाठी ‘इव्हर्मेक्टिनचा’ वापर न करण्याचा WHOचा सल्ला

दरम्यान याआधी जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करत हे औषध न वापरण्याचा इशारा दिला होता. गोवा राज्यात सोमवारी १८ वर्षावरील सर्वांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ही माहिती दिली होती.

काय आहे इव्हर्मेक्टिन ?

इव्हर्मेक्टिनला अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली आहे. हे मलेरियासारख्या आजारांच्या उपचारांसाठी दिले जाणारे औषध म्हणून वापरले जाते. बहुतेकवेळा आतड्यांसंबंधी स्ट्रॉन्डोलायडायसिस आणि ऑन्कोसरिसियासिस विकार असलेल्या असलेल्या रूग्णांसाठी देखील हे वापरले जाते. करोनावरील उपचारांसाठी अजून पर्यंत तरी इव्हर्मेक्टिनला मान्यता मिळाली नसली तरी जगाच्या विविध भागांमध्ये याचा वापर केल्याने रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revised health ministry guidelines drop ivermectin doxycycline from covid treatment abn