वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) शुक्रवारी ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुधारित यादीनुसार, पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ वरून घसरून १७पर्यंत खाली आली आहे. गुणवंतांच्या यादीतील पहिल्या १०० पैकी, १७ जणांना ७२०पैकी ७२०, सहा जणांना ७१६ आणि ७७ जणांना ७१५ गुण मिळाले आहेत.

वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या या परीक्षेच्या निकालावरून यंदा वाद निर्माण झाला आहे. पदार्थविज्ञान या विषयाच्या एका प्रश्नाची दोन उत्तरे आहेत असे ‘एनटीए’ने सांगितले होते, त्याच्या गुणांवरून सर्वोच्च न्यायालयाने सुधारित गुणपत्रिका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शुक्रवारी सुधारित निकाल जाहीर करण्यात आले.

हेही वाचा >>>राज्यसभेत विरोधकांकडून कृषिमंत्र्यांची कोंडी; शेतीमालाच्या हमीभावाच्या कायद्याची मागणी

‘नीट-यूजी’ परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० गुण मिळाले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांना उपरोक्त प्रश्नासाठी संपूर्ण गुण मिळाले होते. नंतर वेळेच्या कारणावरून दिलेले वाढीव गुण मागे घेण्यात आल्यानंतर पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ झाली. पदार्थविज्ञान विषयाच्या वादात सापडलेल्या प्रश्नात संपूर्ण गुण मिळालेल्या ४४ विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्यात आले. त्यामुळे आता केवळ १७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या स्थानांमध्ये बदल

सुधारित यादीनुसार, आधी तिसऱ्या क्रमांकावर असलेला दिल्लीचा एक विद्यार्थी पहिल्या तर चौथ्या क्रमांकावर असलेला उत्तर प्रदेशचा एक विद्यार्थी दुसऱ्या स्थानावर आहे. तर, परीक्षेत ७२० पैकी ७२० मिळालेला महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचे गुण कमी होऊन तो आता २५व्या स्थानावर घसरला आहे. याचप्रमाणे तमिळनाडूच्या एक विद्यार्थी आधी दुसऱ्या क्रमांकावर होता तो आता २६व्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revised result of neetug announced amy