रिती स्पोर्ट्समध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची १५ टक्क्यांची भागीदारी असल्याची माहिती पुढे आल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या विषयावर सध्यातरी आस्ते कदम चालण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या पुढील कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये यासंबंधी चर्चा करण्यात येईल. कार्यकारिणीची बैठक कधी बोलवायची हे जगमोहन दालमियाच ठरवतील, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष निरंजन शहा यांनी म्हटले आहे.
धोनीची १५ टक्के भागीदारी असलेल्या रिती स्पोर्ट्स या कंपनीसोबत रुद्र प्रताप सिंग, रविंद्र जडेजा आणि प्रग्यान ओझा हे तिन्ही क्रिकेटपटू करारबद्ध आहेत. विशेष म्हणजे हे चारही क्रिकेटपटू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळतात आणि धोनी हाच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त आपण वाचले असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, हे देखील तपासून पाहावे लागेल. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले.
बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी या विषयावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला अजून या विषयाची सविस्तर माहिती मिळालेली नाही. विषय सविस्तरपणे समजल्याशिवाय मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे दालमिया यांनी सांगितले.
रिती स्पोर्ट्समधील भागीदारी: बीसीसीआयचा आस्ते कदम चालण्याचा निर्णय
रिती स्पोर्ट्समध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची १५ टक्क्यांची भागीदारी असल्याची माहिती पुढे आल्यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या विषयावर सध्यातरी आस्ते कदम चालण्याचा निर्णय घेतला.
First published on: 05-06-2013 at 11:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhiti sports link m s dhoni probe not on top of bcci agenda