भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे गरिबांना प्रति किलो एक रुपया दराने तांदूळ उपलब्ध करून देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या सत्राला शनिवारी सुरुवात केली. राज्यात दारूच्या नव्या दुकानाला परवानगी न देण्याचा निर्धारही चौहान यांनी व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच चौहान यांनी निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पावले उचलली. चार योजनांना हिरवा कंदील दाखवून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मोठी जनजागृती मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आम्ही मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेणार आहोत. मुलींचे रक्षण केल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकणार नाही, त्यामुळे आपल्याला मुलींचे रक्षण केलेच पाहिजे, महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण हे आपले कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दारूचे नवीन दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.
 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शिवराज सिंह चौहान यांचा शपथविधी झाला. या वेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, लालकृष्ण अडवाणी, शिवसेना व शिरोमणी अकाली दलाचे नेते, सुषमा स्वराज, अरुण जेटली व छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग , राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उद्योगपती अनिल अंबानी या वेळी उपस्थित होते.
गरिबांसाठी प्रति किलो एक रुपया दराने तांदूळ, शेत आणि रस्ते यांना जोडणारी मुख्यमंत्री खेत-सडक योजना, मध्यमवर्गीयांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मध्यम वर्ग आयोगाची स्थापना आणि रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्यासाठी मध्य प्रदेश व्यापार संवर्धन मंडळाची स्थापना करण्यात येणार असून १ जानेवारी २०१४ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा