अभिनेत्री रिचा चड्ढाने सोशल नेटवर्किंगवर केलेल्या एका पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ट्विटरवरुन रिचाने एक रिप्लाय देताना ‘गलवान’ असा उल्लेख करत भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने हे ट्वीट केलं आहे. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये द्विवेदी यांनी, “पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे,” असा उल्लेख करत पाकिस्तान व्याप्त काश्मीरबद्दल विधान केलं. “हा संसदेतील प्रस्ताव एक भाग झाला, आता उरला प्रश्न भारतीय सैन्यांचा तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जेव्हा याबाबतचा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ,” असं विधान उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात बोलताना केलं.
याच विधानातील मजकुरासहीत द्विवेदी यांचा फोटो एका ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो रिट्वीट करत रिचाने, “गलवान सेज हाय” असं म्हटलं आहे. या ट्वीटवरुन बराच वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी या ट्वीटवरुन रिचाला फटकारलं आहे.
रिचाने या ट्वीटमधून भारतीय लष्कराची चेष्टा केल्याचा आरोप अनेकांनी या ट्वीटला रिप्लाय करताना केला आहे. २०२० मध्ये गलवानच्या खोऱ्यामध्ये चीनविरुद्ध झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. भाजपाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी हे ट्वीट अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे. “अपमानजनक ट्वीट. हे लवकरात लवकर मागे घेतलं पाहिजे. आपल्या लष्कराचा अपमान करणं योग्य नाही,” असं सिंग म्हणालेत.
भारतीय युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष निरज जैन यांनीही ट्विटरवरुन फटकारलं आहे. जैन यांनी लोकांना रिचाचं अकाऊंट रिपोर्ट करण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय लष्कराविरोधात बोलणाऱ्या रिचाचं अकाऊंट रिपोर्ट करा असं जैन म्हणालेत.
अनेकांनी रिचाचं हे ट्वीट शहीदांचा अवमान करणारं असल्याचं म्हटलं आहे. जून २०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. मागील ४० वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारत आणि चीनच्या लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यानंतर बराच मोठा वाद निर्माण झाला होता. रिचाने काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता अली फैजलबरोबर लग्न केलं. त्यांचं रिसेप्शन आणि लग्न दिल्ली तसेच लखनौमध्ये झालं. या लग्नामुळे चर्चेत असलेली रिचा आता या ट्वीटमुळे चर्चेत असून वादानंतर तिने हे ट्वीट डिलीट केलं आहे.