सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक रिक्षाचालक दुचाकी टॅक्सी चालकाबरोबर गुंडगिरी करताना दिसत आहे. संबंधित घटना बंगळुरूच्या इंदिरानगर मेट्रो स्टेशन परिसरात चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाचा फोन हिसकावून जमिनीवर आपटताना दिसत आहे.
दुचाकी टॅक्सी चालकाबरोबर झालेल्या या छळाचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत रिक्षाचालक म्हणाला की, मित्रांनो, हा अवैध रॅपिडोचा धंदा कसा करत आहे, ते तुम्ही बघा. हा व्यक्ती दुसऱ्या देशातून आला असून आपल्या शहरात राजासारखा फिरत आहे. अशा रॅपिडो चालकांमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडत आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. हा व्यक्ती दुसऱ्या देशाचा असून पांढऱ्या रंगाची नंबरप्लेट असलेली दुचाकी घेऊन तो एका मुलीला घेण्यासाठी आला आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत संबंधित दुचाकीस्वाराने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
बंगळुरू शहर पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं की, “पोलीस घटनेचा तपास करत आहेत. कठोर आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल.” पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.