युवकांच्या कौशल्यपूर्ण विकासाबाबत केंद्र सरकार उदासीन असल्याची टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या प्रश्नावर नव्या समित्या स्थापन करण्यात आणि कालांतराने त्या बरखास्त करण्यात सरकारने प्रावीण्य मिळविले आहे, असेही मोदी म्हणाले.
युवकांना कौशल्यपूर्ण विकासाचे प्रशिक्षण देण्यास सरकार कालापव्यय करीत असल्याची टीकाही मोदी यांनी केली असून त्याला सरकारचा गैरकारभारच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने २००८ मध्ये मंत्र्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. त्यानंतर कौशल्य विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या दोन्ही संस्था कोणतेही काम करीत नसल्याचे मोदी म्हणाले.
त्यानंतर २००९ मध्ये सरकारने राष्ट्रीय कौशल्य धोरण जाहीर केले. पंतप्रधानांच्या कार्यालयात कौशल्य विकासाबाबत सल्ला देण्यासाठी कार्यालयही उघडण्यात आले. सरकार इतक्यावरच थांबले नाही तर त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था स्थापन केली. तथापि, २०१३ मध्ये सरकारने २००८ पासून स्थापन केलेल्या सर्व समित्या बरखास्त केल्या. समित्या स्फन कशा करावयाच्या आणि त्या बरखास्त कशा करावयाच्या यामध्ये सरकारने प्रावीण्य मिळविले आहे, असेही मोदी म्हणाले.
त्यानंतर गुजरात सरकार काय करीत आहे त्याकडे केंद्र सरकार लक्ष देऊ लागले. मात्र गुजरात सरकारने जे कार्य केले आहे, त्याचा केंद्र सरकार विचारही करू शकत नाही, अथवा तसे कार्य करूही शकत नाही, असेही ते म्हणाले.
अखेरीस केंद्र सरकारने गुजरातच्याच योजनेचा अवलंब केला. आमच्या कौशल्य वरदान केंद्राला कौशल्य विकासाच्या क्षेत्रात पंतप्रधानांचा पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारने २००८ मध्येच ही पावले उचलली असती तर आज आम्ही कोठे असतो, असा सवालही मोदी यांनी केला. कौशल्य विकास या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

मोदी उवाच..
सीबीआय निवडणूक लढवत आहे
विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस सीबीआयचा दुरुपयोग करत आहे. काँग्रेसची ताकद नसल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस नाही तर सीबीआय लढत असल्याचा टोला मोदींनी लगावला.
गांधीजींचे स्वप्न पूर्ण करा
काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा मोदींनी पुन्हा एकदा भोपाळमध्ये दिली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीपासून आपल्याला मुक्ती हवी आहे असे मोदींनी सांगितले. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसची संघटना विसर्जित करावी अशी गांधीजींची इच्छा होती. ते स्वप्न तुम्ही पूर्ण करणार काय? असा प्रश्न त्यांनी जनसमुदायाला विचारला.
आणीबाणी विसरू नका
आणीबाणीत काँग्रेसला जनतेने नाकारले हे लक्षात ठेवावे, असे सांगत मोदींनी आणीबाणीची आठवण करून दिली. आताही जनता तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला.
काँग्रेसेतर राज्यांना सापत्न वागणूक
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची राजवट असताना अटलबिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांनी सापत्न वागणूक दिल्याची तक्रार त्यावेळच्या कुठल्याही काँग्रेसच्या सरकारांनी केली नाही. मात्र आता अनुभव वेगळा येत असल्याचे त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा उल्लेख करत सांगितले.
* नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यावर अडवाणी यांची नाराजी लपून राहिली नव्हती. त्यानंतर हे दोन नेते पहिल्यांदा एकत्र व्यासपीठावर आले. मोदींनी अडवाणी यांना नमस्कार केला. मात्र आशीर्वाद देण्यासाठी अडवाणींनी फारसा प्रतिसाद दिला नाही. दोघांनीही एकमेकांकडे फारसे पाहिले नाही.
त्यामुळे त्यांच्यात नेहमीचा जिव्हाळा नव्हता़
*    नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा देशभर होत आहेत. मात्र भाजपची वाढ ही भाषणांमुळे नव्हे तर कार्यकर्त्यांनी मेहनत केल्याचे अडवाणी यांनी सांगत अप्रत्यक्षपणे मोदींना टोला लगावला.