Waqf Bill Controversy in Nitish Kumar Party: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) (जेडीयू) पक्षाला वक्फ विधेयकामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष एनडीएचा घडक पक्ष आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी जेडीयूने पाठिंबा दर्शविला होता. विधेयक मंजूर झाल्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जाईल. तत्पूर्वी जेडीयूमधील नेत्यांना मात्र पक्षाचा निर्णय रुचलेला नाही. अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आतापर्यंत पक्षाच्या पाच नेत्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
जेडीयूच्या नदीम अख्तर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांच्या आधी राजू नय्यर, तबरेज सिद्दीकी अलीग, मोहम्मद शाहनवाझ मलिक आणि मोहम्मद कासीम अन्सारी यांनी राजीनामा दिला होता. नदीम राजू आणि तबरेज या नेत्यांनी आज तर शाहनवाज आणि मोहम्मद कासीम अन्सारी यांनी कालच (गुरूवारी) राजीनामा दिला होता.
राजू नय्यर यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, जेडीयूने वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात पाठिंबा दिल्यामुळे मी राजीनामा देत आहे. मुस्लिमांच्या विरोधात असलेल्या या काळ्या कायद्याला पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे मला अतीव दुःख होत आहे. मी माझ्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात यावे.
जेडीयू नेते शाहनवाज मलिक यांनी आपल्या राजीनाम पत्रात लिहिले की, माझ्यासारख्या लाखो मुस्लिमांना तुमच्यावर विश्वास होता. तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारे जपणारे खरे नेते आहात, असे वाटत होते. मात्र त्या विश्वासाला आता तडा गेला आहे. तर तबरेज सिद्दीकी अलीग म्हणाले की, जेडीयू पक्षाने मुस्लीम समाजाचा विश्वासघात केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd