बंगळूरु : कर्नाटकातील ‘मुदा घोटाळा’ उघडकीस आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते स्नेहमोयी कृष्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्राकडून त्वरित सुरक्षा देण्याची विनंती केली आहे, यापूर्वी हीच विनंती त्यांनी कर्नाटक सरकारला केली होती, परंतु सरकारने नकार दिला होता. ‘मुदा घोटाळा’ प्रकरणात सर्वप्रथम कृष्णा यांनी तक्रार दाखल केली होती. कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती, इतर नेते आणि प्रभावशाली व्यक्तींच्या नावे म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुदा) अंतर्गत १४ भूखंडांचे बेकायदेशीर वाटप केल्याची तक्रार केली असल्याचा उल्लेखदेखील पत्रात केला आहे.

हेही वाचा >>> शेतकरी नेते डल्लेवाल यांना वैद्याकीय मदत प्रकरण : पंजाब सरकारला अवमानना नोटीस

२६ डिसेंबर रोजी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कारवाईसही नकार दिला त्यामुळेच न्यायालयात तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

तक्रारीची दखल घेत न्यायालयाने लोकायुक्त चौकशीचे निर्देश दिले, असा दाखला देत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला ज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आरोपी क्रमांक एक ठरविण्यात आल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला आहे.

खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप

घोटाळा उघडकीस आणल्यामुळे अनेक खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावादेखील त्यांनी पत्रात केला आहे. यासोबतच जनागुडू टाऊन, देवराजा आणि कृष्णराजा या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीदेखील कृष्णा यांनी पत्रात नमूद केली. एवढेच नव्हे तर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून प्रकरण मागे घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दिल्याचा आरोपदेखील कृष्णा यांनी केला.