पीटीआय, महेसाणा (गुजरात)
‘‘स्थिर सरकार देणाऱ्या जनतेच्या सामर्थ्यांमुळेच देशाचा वेगाने विकास होत आहे. त्यामुळे भारताची जगभरात प्रशंसा होत आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला. गुजरातमधील महेसाणा जिल्ह्यातील खेरालू येथे पाच हजार ९५० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते.राज्यात दीर्घ काळ स्थिर सरकार राहिल्याने एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास कशी मदत झाली आणि त्याचा कसा फायदा झाला, हे गुजरातने अनुभवले आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की आपण एखादा संकल्प केला की त्याची पूर्तता करतोच.
देशात होत असलेल्या गतिमान विकासामुळे जगात भारत प्रशंसेस पात्र ठरत आहे. त्या विकासामागे व्यापक जनशक्तीचा लाभलेला पाठिंबा आहे. या जनतेनेच देशासाठी स्थिर सरकारची निवड केली आहे. मोदी म्हणाले की, जनतेला हे चांगले ठाऊक आहे, की मोठय़ा विकास प्रकल्पांमागे घेतलेले धाडसी निर्णय आणि गुजरातचा झपाटय़ाने होणारा विकास हा गेल्या अनेक वर्षांमध्ये रचलेला मजबूत पाया आहे.
हेही वाचा >>>सेना आमदार अपात्रता याचिकांवर ३१ डिसेंबपर्यंत निर्णय घ्या ; सर्वोच्च न्यायालयाचा राहुल नार्वेकरांना आदेश
तुम्ही आपल्या नरेंद्रभाईंना चांगले ओळखताच. पंतप्रधानपदापेक्षाही तुम्ही मला आपल्यातला नरेंद्र भाई म्हणून पाहता आणि तुमचा नरेंद्रभाई कोणताही संकल्प केल्यानंतर त्याची पूर्तता करतोच. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान