गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममधील खांडसा या गावात अज्ञात जमावाने सोमवारी भल्या पहाटे मजारीमध्ये आग लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आगीत काही प्रार्थना सामग्री जळाली, असे मजारीच्या व्यवस्थापकांनी सांगितले. अधिक नुकसान होण्यापूर्वी पोलिसांनी आग विझवली. या मजारीला हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मामधील भाविक भेट देत असतात.
नुह, गुरुग्राम आणि नहरियाणाच्या काही भागांमध्ये मागील आठवडय़ात उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर गुरुग्राममध्ये जमावबंदी लागू असताना हा प्रकार घडला. जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी उठवली.
मजारीचे व्यवस्थापक घसिटे राम म्हणाले की, ते गेल्या सात वर्षांपासून या मजारीमध्ये काम करत आहेत. या मजारीमध्ये सर्व धर्माचे लोक प्रार्थना करण्यासाठी येत असतात, असे त्यांनी सांगितले. ही मजार बाजाराच्या मध्यभागी असून त्यामध्ये पीरबाबाच्या कबरीबरोबरच आतील भिंतींवर हिंदू देवतांच्या प्रतिमाही आहेत. मजारीच्या बाहेरील भिंतीवरही हिंदू देवतेचे चित्र असून ओम आणि स्वस्तिकची चिन्हे आहेत.
उच्च न्यायालयाची अतिक्रमणविरोधी मोहिमेला स्थगिती
हरियाणामधील हिंसाचारग्रस्त नूहमधील अतिक्रमणविरोधी मोहिमेला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. न्या. जी एस संधवालिया यांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेऊन सरकारला यापुढे कोणतेही पाडकाम न करण्याचे निर्देश दिले. नूहमध्ये गेल्या आठवडय़ात उसळलेला हिंसाचार शमत असताना जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेऊन बेकायदा पद्धतीने बांधलेल्या इमारतींवर बुलडोझर चालवण्यात आला. दंगलखोरांनी यापैकी काही इमारतींचा वापर केला होता, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.