एका टीव्ही कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांचा अवमान केल्याप्रकरणी कानपूरमध्ये दंगल उसळली आहे. शुक्रवारी नमाजनंतर एका गटाने शहरातील नई सडक आणि यतीमखाना भागात दुकानदारांना शटर खाली करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन गटांत वादाला सुरुवात झाली आणि दंगल उसळली. संतप्त जमावाने एकमेकांवर बॉम्ब आणि दगडफेक केली. या दंगलीत एकूण १२ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात कथितपणे प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. यानंतर हा वाद उफाळला. या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी १८ जणांना अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सशस्त्र पोलीस दलांची एकूण १२ पथकं या भागात तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अजय पाल शर्मा या एसपी दर्जाचे अधिकारी लखनऊवरून कानपूरला पाठवण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, “घटनेच्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे केवळ हिंसाचारात सहभागी असलेल्यांची ओळख पटवली जात नाही. तर या कटात सहभागी असणाऱ्या आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे. आतापर्यंत एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि कट रचणाऱ्यांविरोधात गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील किंवा पाडल्या जातील,” असंही ते म्हणाले.

कानपूर दंगलीच्या घटनाक्रमाबद्दल बोलताना कानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना म्हणाले की, “घटनेच्या दिवशी दुपारी २ च्या सुमारास ५० ते १०० लोकांच्या एका गटाने घोषणाबाजी करत परिसरातील दुकानदारांना दुकानं बंद करण्यास सांगितलं. दरम्यान दुसऱ्या गटाने याला विरोध करण्यात आला. त्यानंतर दगडफेक झाली. मात्र, पोलीस दलानं परिस्थितीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवलं आहे.”