ब्रिटनचे पंतप्रधान भारतीय वंशाचे असल्याचं जगजाहीर आहे. ते भारताचे जावई अर्थात नारायण मूर्ती यांच्या कन्येचे पती आहेत हेही जगजाहीर आहे. पण सुनक यांच्या कुटुंबीयांचं भारतप्रेम मात्र सगळ्यांना फारसं परिचित झालेलं नाही. त्यातही ऋषी सुनक यांच्या आई भारतीय पदार्थ बनवू शकतात, ही बाबही अगदी कालपर्यंत फारशी कुणाला माहिती नव्हती. पण खुद्द ऋषी सुनक यांनीच यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. पण ती माहिती देताना त्यांनी एक फारच रंजक किस्सा सांगितला. हा किस्सा होता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीचा!
ऋषी सुनक यांची इन्स्टाग्राम पोस्ट!
ऋषी सुनक यांनी रविवारी दुपारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमधले आहेत. या मुलाखतीत ऋषी सुनक यांनी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या आईने बनवलेली भारतीय मिठाई अर्थात बर्फी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेली भेट यासंदर्भातला किस्सा सांगितला आहे.
…आणि झेलेन्स्कींनी भारतीय ‘बर्फी’ टेस्ट केली!
“झेलेन्स्कीनी तुमच्या आईनं बनवलेली बर्फी टेस्ट केली असं काही रोज घडत नाही”, अशी पोस्ट त्यांनी या व्हिडीओबरोबर इन्स्टाग्रामवर केली आहे. या व्हिडीओमध्ये ऋषी सुनक यांनी त्यांच्या आईनं त्यांना स्वत: बनवलेली बर्फी दिल्याचं सांगितलं.
…आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक स्वत: बुलेटप्रूफ जॅकेट घालून उतरले रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?
“माझी आई जेव्हा मला एका फुटबॉल सामन्यादरम्यान भेटली, तेव्हा तिनं स्वत: तयार केलेली भारतीय मिठाई, अर्थात ‘बर्फी’ तिनं माझ्यासाठी दिली. त्यानंतर सोमवारी मी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. आम्ही दोघं जेव्हा बोलत होतो, तेव्हा त्यांना भूक लागली. त्यावेळी मी थेट त्यांना ती बर्फी देऊ केली. त्यांनीही ती चवीनं खाल्ली. माझ्या आईला हे ऐकून खूप आनंद झाला”, असं सुनक म्हणाले.
ऋषी सुनक हे त्यांच्या अशा व्हिडीओंमुळे किंवा फोटोंमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांचा बुलेटप्रूफ जॅकेट घालून रस्त्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
लंडनमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांना अटक करण्याची मोहीम ब्रिटन सरकारनं सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘डे ऑफ अॅक्शन’ या कृती कार्यक्रमात सुनक स्वत: सहभागी झाले होते.