UK General Election 2024 Result, Indian-Origin Leaders : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने मोठा विजय मिळविल्यानंतर किर स्टार्मर हे आता पंतप्रधानपदावर आरूढ होतील, अशी चिन्ह दिसत आहेत. मजूर पक्षाने हुजूर पक्षाची १४ वर्षांची सत्ता मोडीत काढत मोठ्या फरकाने विजय मिळविला. स्टार्मर यांनी या विजयाचे श्रेय जनतेला देत असताना देशात आता लोकसेवेचे राजकारण सुरू होईल, असे सांगितले.
ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले पहिलेच भारतीय वंशाचे पुढारी होते. ऋषी सुनक यांनी आपला पराभव मान्य करत हुजूर पक्षाच्या समर्थकांची माफीही मागितली. तसेच त्यांनी किर स्टार्मर यांचे अभिनंदन व्यक्त केले. सुनक म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर यांनी विजय मिळविला असून मी त्यांना शुभेच्छा देतो. आज अतिशय शांत वातावरणात सत्तांतर होत आहे. भविष्यात देशात स्थिरता निर्माण होण्यासाठी आजच्या निकालातून नक्कीच आत्मविश्वास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
UK Election : ऋषी सुनक समर्थकांना उद्देशून म्हणाले ‘सॉरी’, नेमकं काय घडलं?
ऋषी सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थलर्टन या मतदारसंघातून विजय मिळवत संसदेत प्रवेश केला आहे. ब्रिटनच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेत प्रथमच भारतीय वंशाच्या खासदारांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
ब्रिटिश फ्युचर थिंक टँकने ब्रिटनच्या निवडणुकीचे याआधी केलेल्या विश्लेषणानुसार मजूर पक्षाकडे सर्वाधिक जातीय अल्पसंख्याक खासदारांचा भरणा असेल असे सांगितले जात होते. ब्रिटिश फ्युचर थिंक टँकचे संचालक सुंदर कटवाला यांनी सांगितले की, या निवडणुकीतून सर्वाधिक जातीय अल्पसंख्याकांचा विजय झाला आहे. त्यामुळे संसदेत बहुरंगी प्रतिनिधित्व दिसणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भारतीय वंशाचे १५ खासदार निवडून आले होते. यावेळी या खासदारांसह आणखी काही नवीन खासदार निवडून आले आहेत.
UK Elections 2024 निवडणुकीत निवडून आलेले भारतीय वंशाचे खासदार कोण?
१. ऋषि सुनक – हुजूर पक्ष
२. शिवानी राजा – हुजूर पक्ष
३. कनिष्क नारायण – मजूर पक्ष
४. सुएला ब्रेव्हरमन – हुजूर पक्ष
५. प्रीती पटेल – हुजूर पक्ष
६. नवेंदू मिश्रा – मजूर पक्ष
७. प्रीत कौर गिल – मजूर पक्ष
८. तनमनजीत सिंग ढेसी – मजूर पक्ष
९. व्हॅलेरी वाझ – मजूर पक्ष
१०. सोनिया कुमार – मजूर पक्ष
११. हरप्रित उप्पल – मजूर पक्ष
१२. डॉ. नील शास्त्री-हर्स्ट – हुजूर पक्ष
१३. सीमा मल्होत्रा – मजूर पक्ष
१४. वरिंदर जुस – मजूर पक्ष
१५. गुरिंदर जोसन – मजूर पक्ष
१६. जस अठवाल – मजूर पक्ष
१७. बॅगी शंकर – मजूर पक्ष
१८. सतवीर कौर – मजूर पक्ष