नदी जोड प्रकल्प राबवण्यापासून आपण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आपण रोखले व आताचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नदी जोड प्रकल्प ही एक धोकादायक योजना आहे, असे खासदार मनेका गांधी यांनी बुधवारी सांगितले.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नदी जोड प्रकल्प राबवण्याचे ठरवले होते पण आपण त्यांना रोखले, असे त्या म्हणाल्या.
गोमती नदी शारदा नदीला जोडण्याबाबत विचारले असता ओनला मतदारसंघाच्या खासदार असलेल्या मनेका म्हणाल्या, की आपण अटलजींना त्या नदी जोड योजनेपासून परावृत्त केले, या योजना म्हणजे बकवास आहे. जगात या योजनेइतकी वाईट योजना नाही, असा दावा मनेका यांनी केला.
प्रत्येक नदीला स्वत:ची परिसंस्था असते. मासे वेगळे असतात, पाण्याचा पीएच वेगळा असतो, जर एक नदी दुसऱ्याला जोडली, तर दोन्ही नद्यांतील मासे व अन्य प्राणी मरतील; त्यामुळे नदीजोड प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर व्हायला हवेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कालवे बांधता येतील, ते स्वच्छ करता येतील पण गंगा व गोमती यांना जोडले तर ते फार भयानक असेल. या प्रकल्पासाठी १०-१५ लाख एकर जमीन लागेल व ती वाया जाईल, एवढी जमीन कोण देणार आहे असा सवाल करून त्या म्हणाल्या, की मोदी यांनी त्यांच्या सभांमध्ये नद्या जोडून देशातील दुष्काळ दूर करण्याचे मनसुबे बोलून दाखवले पण अशी योजना प्रत्यक्षात आणणे घातक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा