पीटीआय, नवी दिल्ली/पाटणा : राष्ट्रीय जनता दलाने (राजद) रविवारी नवीन संसद भवनाच्या त्रिकोणी आकाराची शवपेटीशी तुलना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसदभवनाचे उद्घाटन होताच बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या राजदने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नवीन संसद भवनाची इमारत आणि शेजारी एक शवपेटीचे चित्र प्रसृत करत ‘हे काय आहे?’ असा सवाल केला आहे. त्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता राजदला शवपेटीत गाडेल, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
भाजपच्या बिहार शाखेने या ‘ट्वीट’ला प्रत्युत्तर देताना नमूद केले, की पहिले शवपेटीचे चित्र तुमचे भवितव्य आहे आणि दुसरे संसद भवनाचे चित्र भारताचे भवितव्य आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ‘राजद’च्या ‘ट्वीट’ला घृणास्पद म्हटले आहे. गौरव भाटिया यांनी नमूद केले, की शवपेटी राजदची आणि संसद देशाची आहे. पूनावाला म्हणाले, की ‘राजद’ किती खालच्या पातळीवर घसरली आहे, हे यावरून दिसते. राजदचे राजकारण शवपेटीत जाऊन ते बंदिस्त केले जाईल.
‘ट्वीट’चे समर्थन
‘राजद’ने केलेल्या ‘ट्वीट’चे समर्थन करताना पक्षाचे बिहार शाखेचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले, की ज्या पद्धतीने नव्या संसदभवनाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले, त्यावरून लोकशाही गाडली गेल्याचेच दिसते. राष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती यांना या सोहळय़ाचे आमंत्रण नव्हते. लोकशाहीमध्ये असे घडत नसते.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन
उद्घाटन सोहळय़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रण दिले गेले नव्हते; पण त्यांच्या अभिनंदनाच्या संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी लोकसभेत दुपारी झालेल्या कार्यक्रमात केले. लोकशाहीची परंपरा टिकवण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे नवी इमारत हे द्योतक आहे. गेल्या सात दशकांमध्ये संसदेतील अनेक वैधानिक स्थित्यंतरांमुळे कोटय़वधी लोकांचे आयुष्य बदलले आहे. घटनाकारांना अपेक्षित असलेला देश घडवण्यासाठी संसद सदस्यांनी प्रयत्न केले असून संसदेच्या विश्वासार्हतेचे प्रतीक असलेल्या पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद आहे, असे मुर्मू यांनी संदेशात म्हटले आहे. संसदप्रमुख या नात्याने राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याचा निषेध म्हणून विरोधकांनी सोहळय़ावर बहिष्कार टाकला होता.