RJD leader Rabri Devi Angry on Nitish Kumar : राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेत्या राबडी देवी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राबडी देवी म्हणाल्या की “नितीश कुमार हे भंगेडी (गंजेडी) आहेत. ते विधीमंडळात भांग पिऊन येतात. ते सभागृहात महिलांचा अपमान करतात.” बिहार विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असून आज विधान परिषदेत नितीश कुमार व राबडी देवी यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राबडी देवी आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. राबडी देवींसह राजद आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणा देत आंदोलन केलं.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राबडी देवी यांच्याशी बातचीत केली आणि आंदोलनाचं कारण विचारलं. त्यावर राबडी देवी म्हणाल्या, “नितीश कुमार भंगेडी आहेत. ते भांग पिऊन सभागृहात येतात. महिलांना काहीही बोलतात. त्यांना अपमानित करतात. बिहारच्या महिलांचा अपमान करतात. आमचा सभागृहात अनादर करतात. ते सभागृहात म्हणाले, २००५ च्या आधी राज्यात कोणी कपडे परिधान करत नव्हतं. मला त्यांना आणि त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायचं आहे की त्यांच्या घरातल्या लेकी-बाळी २००५ च्या आधी कपडे परिधान करत नव्हत्या का? त्यांच्या घरातील त्यांची आई, बहीण व मुली कपडे परिधान करत नव्हत्या का? २००५ च्या आधी बिहारमध्ये विकास झाला नव्हता का?
राबडी देवींचा नितीश कुमारांवर संताप
राबडी देवी म्हणाल्या, “आम्ही बिहारसाठी काय केलंय हे राज्यातील जनतेला माहिती आहे. महिलांसाठी, वंचितांसाठी कामं केली आहेत. हे नितीश कुमार २००५ नंतर जन्माला आले आहेत का? त्यांचे पंतप्रधान २०१४ नंतर जन्माला आले आहेत का? त्यांच्या आधी राज्यात, देशात विकासकामे होत नव्हती का? माझ्यासह बिहारमधील महिलांना नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा अपमानित केलं आहे. मुख्यमंत्री असा असतो का?
सभागृहात काय घडलं होतं?
राबडी देवींकडे बोट करून नितीश कुमार म्हणाले, “या लोकांच्या काळात राज्यात काही कामं व्हायची का? आम्ही सत्तेत आल्यावर एकेक करून सगळी कामं केली. हिंदू-मुस्लीम तेढ संपवली. महिलांसाठी काहीच केलं जात नव्हतं. आम्ही त्यांच्यासाठी कामं केली, आरक्षण दिलं. त्यानंतर नितीश कुमार व राबडी देवी यांच्यात खडाजंगी झाली.