RJD MLA Viral Video : बिहार विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार मुकेश रोशन यांचा एक व्हिडिओ देशभरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश रोशन डोळ्यावर काळी पट्टी बांधून विधान भवनाच्या परिसरात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान या सर्व प्रकाराबद्दल आमदार मुकेश रोशन यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, “राज्यात सुशासन बाबूंना काहीच दिसेना झाले आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यात कुठेही भ्रष्टाचार किंवा अपराध दिसत नाही.” बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार<br>यांना सुशासन बाबू म्हणून ओळखले जाते.

“बिहार में बहार है”

आमदार मुकेश रोशन विधान भवनाच्या परिसरात डोळ्यावर काळी पट्टी बांधून आल्यानंतर, त्यांच्या हातात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे स्केच असलेले एक पोस्टरही होते. या पोस्टरवर, “बिहार में बहार है गोलियों की बौछार है, अपराधियों की सरकार है हर दिन हो रहा लूट हत्या और बलात्कार है, फिर भी कहते हैं कि बिहार में बहार है नीतीशे कुमार है”, असे लिहिले होते.

मुकेश रोशन काय म्हणाले?

यावेळी बोलताना आमदार मुकेश रोशन म्हणाले, “मी सुशासन बाबू आहे. मी आंधळा झालो आहे, मला काहीही दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक गैरव्यवहार झाले आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी.”

भाजपाची टीका

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार मुकेश रोशन यांच्या या आंदोलनावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पोटनिवडणुकीत चारही मतदारसंघात पराभव झाल्यामुळे काहीच दिसेना झाले आहे. त्यामुळे त्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. त्यांना विकास दिसत नसला तरी जनता सर्वकाही पाहत आहे. त्यांनी १५ वर्षे डोळे बंद करुन मलई खाल्ली आहे.”

कोण आहेत मुकेश रोशन?

बिहार विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, डोळ्यावर पट्टी बांधून आलेले आमदार मुकेश कुमार राष्ट्रीय जनता दलाचे प्रतिनिधित्तव करतात. त्यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत वैशीली जिल्ह्यातील महुआ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मुकेश रोशन हे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते असलेले तेजस्वी यादव यांच्या जवळचे मानले जातात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd mla mukesh roshan viral video bihar assembly session nitish kumar tejaswi yadav aam