सध्या देशात इंडिया व भारत या दोन नावांची चर्चा चालू आहे. वास्तविक आत्तापर्यंत तमाम भारतीयांना या दोन्ही नावांच्या उच्चारानंतर एकसारखंच देशभक्तीचं स्फुरण चढायचं. पण काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. थेट देशाच्या राष्ट्रपतींकडून जी२० देशांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतही प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आता या नावावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून भारत हे नावच देशाची प्राचीन काळापासूनची ओळख असून इंडिया हे नाव इंग्रजांनी दिल्याचा दावा केला जात आहे. तर विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेताना राज्यघटनेतील उल्लेखाचाच दाखला दिला जात आहे. यासंदर्भात राजदचे राज्यसभा खासदार मनोजकुमार झा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सत्ताधारी भाजपाला परखड सवाल केले आहेत.

“मोदी चालिसासाठी आम्ही संसदेत बसणार नाही, पण…”, विशेष अधिवेशनाबाबत काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

“…मग तुम्ही कुठे जाल?”

“एवढी भीती? १९ जुलैच्या आधी तर हे कधीच आम्ही तुमच्या तोंडून ऐकलं नाही. १९ जुलैला विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली. तुम्ही भीतीपोटी आणखी काय काय हिसकून घेणार? आमची टॅगलाईन आहे ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’. आता आमची चर्चा चालू आहे. समजा आम्ही इंडियाबरोबरच भारत नावही आघाडीला दिलं, तर मग तुम्ही कुठे जाल? कोणतं नाव शोधाल?” असे सवाल मनोजकुमार झा यांनी उपस्थित केले आहेत.

“हा काय खेळ चालवलाय? राज्यघटनेचा आदर करा. त्याहून मोठं पुस्तक कोणतंच असू शकत नाही. घटनेच्या कलम एकमध्ये म्हटलंय ‘इंडिया.. दॅट इज भारत’. प्रेम इंडियावरही आहे, प्रेम भारतावरही आहे. तुम्ही तुमच्या भीतीपोटी आणखीन काय काय हिसकावून घ्याल देशाच्या नागरिकांकडून? जरा शांतपणे अनुलोम-विलोम करा”, असं मनोजकुमार झा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd mp prakashkumar jha mocks pm narendra modi on india vs bharat name pmw