महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झाली नाही, बघितली नव्हती अशी मोठी बंडखोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केली. तसेच, आमदार, खासदारांचा पाठिंबा असल्याने ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाणा’वरही शिंदेंनी हक्का सांगितला. हे प्रकरण आधी सर्वोच्च न्यायालयात आणि मग निवडणूक आयोगाकडे गेलं. त्यानंतर आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आणि शिंदे गटाला नवं नावही मिळालं आहे.
राज्यातील या राजकारणाचा धसका अन्य पक्षांनीही घेतल्याचं पाहायला मिळतं. सोमवारी दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भविष्यात पक्षाचे चिन्ह अथवा नावाबद्दलचा निर्णय राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवच घेतील.
हेही वाचा – दोन गोळ्या लागूनही लष्कराच्या श्वानाचा दहशतवाद्यांशी लढा, दोन दहशतवादी ठार; रुग्णालयात देतोय झुंज
या ठरावाची दोन कारणे समोर येत आहेत. एक म्हणजे शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेली बंडखोरी. दुसरा, आगामी काळात जनता दल यूनायटेडमध्ये पक्षाचे विलीनीकरण करायचे झाल्यास कोणत्या नेत्याने अथवा आमदारांनी बंडखोरी करत पक्षावर दावा सांगू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘शहरी नक्षलवाद्यांचा’ गुजरात नाश घडवेल ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास, ‘आप’वर जोरदार टीका
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी या बैठकीत मोठी घोषणा केली होती. त्यांनी म्हटलं की, “माझ्यानंतर माझा मुलगा तेजस्वी यादव हेच या पक्षाचे नेतृत्व करतील. तसेच, पक्षांतर्गत काही निर्णय असतील तेही तेजस्वी यादवच घेतील.”