RJD post Nitish Kumar photo in RSS attire : देशात गेल्या काही दिवसांपासून वक्फ सुधारणा विधेयकाची चर्चा होताना दिसत आहे. लोकसभेपाठोबाठ काल रात्री हे विधेयक राज्यसभेत देखील मंजूर करण्यात आले आहे. यादरम्यान या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार यांचा राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) पक्षाने ‘चिटीश कुमार’ असा उल्लेख केला आहे. इतकेच नाही पांढरा शर्ट आणि खाकी पँट परिधान केलेल्या नितीश कुमार यांनी फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
नितीश कुमार यांच्या पक्षाने संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर जनता दल (युनायटेड) पक्षाच्या दोन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आरजेडीने देखील नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
राष्ट्रीय जनता दल पक्षाने फेसबुकवर एक फोटोशॉप केलेले छायाचित्र शेअर केले आहे.ज्यामध्ये नितीश कुमार हे आरएसएसचा ओळख असलेला पांढरा शर्ट, खाकी पँट आणि काळी टोपी या गणवेशात दिसत आहेत. बिहारमधील विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने या फोटोला “आरएसएस सर्टिफाइड मुख्यमंत्री चिटीश कुमार” असे कॅप्शन दिले आहे.
या पोस्टमधून आरजेडीने धर्मनिरपेक्ष अशी ओळख असलेल्या नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आला आहे. तसेच वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपाची बाजू घेतल्यानंतर नितीश कुमार हे आरएसएसच्या विचारधारेने प्रभावित झाले आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वक्फ विधेयक मंजूर झाल्याने वक्फच्या मालमत्तांची देखरेख आणि त्यांच्याशी संबंधित वाद सोडवण्यात सरकारची भूमिका वाढणार आहे. यादरम्यान या विधेयकावरून नितीश कुमार यांच्या पक्षातील मुस्लिम समाजांच्या नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे, काही नेत्यांनी तर पक्ष देखील सोडला आहे.
जनता दल (युनायटेड) आणि टीडीपी या दोन पक्षांचे अनुक्रमे १२ आणि १६ खासदार लोकसभेत आहेत. यांचा पाठिंबा सभागृहात वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. दरम्यान यानंतर मोहम्मद कासीम अन्सारी, मोहम्मद शहनवाझ मलिक आणि मोहम्मद तबरेझ सिद्दीकी यांनी राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र जनता दर युनायटेडचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी सांगितलं की कासिम अन्सारी किंवा शाहनवाज मलिक हे दोघेही आमच्या रँक आणि फाइलचा भाग नव्हते.
नितीश कुमार यांनी वक्फ विधेयकाला मंजूरी दिल्याबद्दल अनेक मुस्लिम नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. ज्यामध्ये वरिष्ठ नेते गुलाम गौस आणि माजी राज्यसभा खासदार गुलाम रसूल बल्यावी यांचा समावेश आहे. तर बिहारमधील काही मुस्लिम नेत्यांनी वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
बिहारच्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के मुस्लिम आहेत आणि जनता दल (युनायटेड) पक्षाला या समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमिवर नितीश कुमार यांना याचा फटका बसू शकतो.