RJD to Stop Using Green Gamcha: गेल्या २८ वर्षांपासून, म्हणजेच पक्षाची स्थापना झाल्यापासून राजद अर्थात राष्ट्रीय जनता दलाची ओळख बनलेला हिरवा गमचा आता इतिहासजमा होणार आहे. कारण पक्षानंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात यासंदर्भातले लेखी आदेश पक्षाकडून जारी करण्यात आले असून त्यानुसार आता गमचा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी टोप्या वापरण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं आहे. राजदच्या या निर्णयाची सध्या चर्चा सुरू असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
राजदचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांच्या अनुमतीने यासंदर्भातले आदेश पक्षानं पारित केले आहेत. यामध्ये पक्षाची इतकी वर्षं ओळख ठरलेला हिरव्या रंगाचा गमचा न वापरण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बिहारमधील विधानसभा विरोधी पक्षनेते व पक्षाचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रम यात्रेच्या तोंडावरच पक्षानं हा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
तेजस्वी यादव यांची कार्यकर्ता संवाद यात्रा
तेजस्वी यादव लवकरच राज्यभरात कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामागे पक्षसंघटना मजबूत करणे व पक्षसंघटनेवर आपला अंमलही मजबूत करणे याअनुषंगाने ही यात्रा काढण्यात आल्याचां बोललं जात आहे. मंगळवारपासून या यात्रेला सुरुवात झाली.
१९९७ साली पक्षाची स्थापना झाल्यापासून हिरव्या रंगाचा गमचा पक्षाच्या कार्यकर्त्यांची ओळख बनला होता. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांनी नेहमीप्रमाणे हा गमचा गळ्याभोवती न गुंडाळता डोक्यावर एखाद्या पगडीप्रमाणे गुंडाळला होता. मात्र, आता तो वापरूच नका, असे आदेश पक्षाकडून देण्यात आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी हा निर्णय घेतल्याची सांगितलं जात आहे.
पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न?
“हा हिरवा गमचा डोक्याभोवती जरी गुंडाळला तरी तो प्रतिगामी आणि आक्रमक वृत्तीचं प्रतीक वाटतो. हे सगळं आमच्या पक्षाच्या विचारसरणीशी जुळत नाही. पक्षाचं लक्ष प्रगतीशील सुधारणांवर केंद्रीत आहे. म्हणून पक्षानं हा गमचा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती राजदमधील एका सूत्राकडून मिळाल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
“पक्षाच्या कार्यक्रमांसाठी गमचा वापरण्याऐवजी हिरव्या रंगाची टोपी परिधान करा आणि तसाच बॅचही लावा”, असं या आदेशाच्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत फोटो काढताना शिस्तीचं पालन करावं, असंही बजावण्यात आलं आहे.