Crime News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक विचित्र घटना उजेडात आली आहे. या सर्व घटनाक्रमाची सुरूवात झाली ती बुधवारी घडलेल्या एका रस्ता अपघातापासून… या अपघातानंतर एका बहुमजली इमारतीत तीन मृतदेह सापडले आणि एकच खळबळ उडाली. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी हत्येसह इतरही सर्व शक्यतांचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तीन व्यक्तींना घेऊन जाणारी एका कार अभिशीक्ता मोरे येथे इएम बायपासजवळ एका खांबाला धडकली. या अपघातात ते तीन जण जखमी झाले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका व्यक्तीची चौकशी केली असता त्याने एका धक्कादायक प्रकाराबद्दल कबुली दिली. त्याने सांगितलं की, त्यांनी मुद्दाम आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गाडीने खांबाला धडक दिली आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील यापूर्वीच आत्महत्या केली आहे.

दरम्यान ही माहिती मिळताच तांगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दाखल झाले. या फ्लॅटमध्ये त्यांना दोन महिला – रोमी डे आणि सुदेशना डे यांच्यासह एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आले. कारने प्रवास करत असलेल्या तीन प्रवाशांमध्ये प्रणय डे आणि त्याचा भाऊ प्रसून डे यांचा समावेश आहे. इंडियन एक्सप्रेसने यांसंबंधीचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांनी या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल सांगितले की, “आज सकाळी तीन मृतदेह सापडले, ज्यात एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. गरफा येथे एक अपघात झाला होता, येथून पोलिसांना कळले की त्यांचे नातेवाईक एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत पडले आहेत.”

वर्मा म्हणाले की, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि पीडितांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनची तपासणी केली जात आहे. दोन्ही महिलांच्या मनगटांना जखमा झाल्या आहेत. मृत आढळलेल्या तिघांच्या शवविच्छेदन आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

सह पोलिस आयुक्त रुपेश कुमार यांनी सांगितले की कुटुंबात सहा सदस्य होते, “त्यांच्यापैकी काही जणांनी आत्महत्या केल्याच्या दाव्याची खात्री केली जात आहे. कार खांबाला धडकली. तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की एका पत्त्यावर तीन मृतदेह पडून आहेत. त्यानंतर ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत”.

पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार. कार अपघातातील पीडितांनी असा दावा केला आहे की त्यांनी कार खांबावर आदळण्यापूर्वी, तिघांनी त्यांच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रशासकीय अधिकारी या दाव्याची तपासणी करत आहेत. “आम्ही हे देखील तपासत आहोत की, गाडी चालवताना त्यांनी सीटबेल्ट लावले होते का, कारण त्यांनी दावा केला होता की ते देखील आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. असे असेल तर ते सीटबेल्ट का लावतील?” एका अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.

Story img Loader