Gujarat Husband Killing: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने प्रियकराच्या साथीने पतीचा खून केला. त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरले आणि प्रियकराबरोबर मनालीला जाऊन हनिमून साजरा केला. हे प्रकरण देशभरात गाजत असताना आता अशाच प्रकारचा गुन्हा गुजरातमध्येही घडल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या जामनगर येथे रिंकल नामक महिलेने तिचा प्रियकर अक्षय डांगरियाच्या साथीने पती रवी धीरजलालचा खून केला. पत्नी आणि प्रियकराने पतीचा खून करताना अपघाताचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्यांचा हा बनाव उघडा पडला.

रवी धीरजलालचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी या प्रकरणात काहीतरी वेगळं असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली. तपास करत असताना पोलिसांना रिंकल आणि अक्षयच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली. पोलिसांनी रिंकलची कसून चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला.

जानमगरचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक आर. बी. देवधारा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, रिंकल आणि अक्षयला रवी धीरजलालचा खून केल्याप्रकरणी अटक केली आहे.

एक वर्षांपासून सुरू होती योजना

पोलिसांनी पुढे सांगितले की, ६ एप्रिल रोजी रविवारी सायंकाळी जामनगर येथील महामार्गावर रवीचा मृतदेह आढळून आला. रवी आपल्या बुलेटवर कालावड पासून जामनगरला येत होता. रिंकलनेच अक्षयला त्याचे लोकेशन पाठवले. अक्षयने त्याच्या जीपने रवीचा पाठलाग केला आणि विजरखी धरणाजवळील निर्जन स्थळी रवीच्या बुलेटला धडक दिली. या धडकेत रवीचा मृत्यू झाला.

रिंकल आणि अक्षय यांचे फार पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. रवीला याची कल्पना होती. या कारणामुळे त्यांच्यात नेहमी भांडणेही होत असत. रिंकलसाठी अक्षयने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रिंकलही रवीपासून घटस्फोट मागत होती. मात्र रवी यासाठी तयार नव्हता. यासाठी दोघांनी त्याला बाजूला करण्यासाठी थेट त्याचा खून केला.

मुस्कान रस्तोगी प्रकरण काय आहे?

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये मार्च महिन्यात मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूतची हत्या झाली होती. मुस्कान रस्तोगी या महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून एका ड्रममध्ये भरून वरून काँक्रिट ओतून बंद केले होते. एवढेच नाही तर पतीची हत्या केल्यानंतर पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे दोघे हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाला अटक केली.