Statue of Unity : महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधल्या राजकोट या ठिकाणी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. ही घटना २६ ऑगस्ट रोजी घडली. आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला ( Statue of Unity ) जोडणाऱ्या रस्त्याबाबत माहिती समोर आली आहे. हा रस्ता पुराच्या पाण्यात तुटला आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरु आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीला ( Statue of Unity ) यायचं असेल तर तुमचं या तुटलेल्या रस्त्यावर स्वागत आहे अशी खोचक पोस्ट काँग्रेसने केली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

धरणाच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला ज्यानंतर रस्ता तुटला आहे

मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर रस्ता तुटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पाऊस थांबल्यानंतरच हा रस्ता पुन्हा बांधून काढावा लागणार आहे. रस्ता ज्या प्रकारे तुटून पडला आहे ते पाहता काही महिने तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणार आहेत. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसने पोस्ट लिहिली आहे.

काँग्रेसची पोस्ट काय?

वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी! ( Statue of Unity ) या ठिकाणचा रस्ता म्हणजे एक भलमोठं कोडं बनला आहे. जर तुम्ही सुखरुप स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहचू शकलात तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट मिळतील अशी खोचक पोस्ट काँग्रेसने केली आहे.

हे पण वाचा- गुजरातमध्ये फिरण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वात सुंदर ठिकाणं!

२०१८ मध्ये उभारण्यात आला आहे पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारला जावा म्हणून २०१३ मध्ये भूमिपूजन केलं होतं. २०१८ मध्ये हा भव्य पुतळा उभा राहिला. यासाठी २९८९ कोटी म्हणजेच जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१८ मध्ये जगातला हा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला भेट देण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. सरदार सरोवराच्या जवळ हा पुतळा उभारण्यात आल्याने गुजरातला या पुतळ्याच्या रुपाने नवं पर्यटन स्थळ लाभलं आहे. तसंच अनेक स्थानिकांना रोजगारही मिळाला आहे. दरम्यान या ठिकाणी रस्ता तुटून पडला आहे, त्यामुळे हेच का मोदींचं गुजरात मॉडेल असा प्रश्न विरोधक आणि खासकरुन काँग्रेसचे नेते विचारु लागले आहेत. तसंच अनेकांनी या बातमीच्या व्हायरल व्हिडीओवरही विविध कमेंट करत भाजपावर आणि मोदींवर टीका केली आहे.