Robert Vadra On Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान महाकुंभमेळा पार पडला. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मात्र, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाकुंभमेळ्यात जाणार की नाही याबाबत अनेकांना उत्सुकता होती. पण राहुल गांधींनी महाकुंभमेळ्याला हजेरी लावली नाही. त्यामुळे राहुल गांधींवर भाजपाच्या नेत्यांनी टीका देखील केली.
दरम्यान, राहुल गांधींनी कुंभमेळ्याला का हजेरी लावली नव्हती? याचा खुलासा आता काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केला आहे. तसेच महाकुंभमेळ्याला न जाण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाचं रॉबर्ट वाड्रा यांनी समर्थनही केलं आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं की, “त्यांचं कुटुंब धर्माचं सार्वजनिक प्रदर्शन करण्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच राहुल गांधींसारखे नेते अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे यात्रेकरूंना अडथळा निर्माण झाला असता किंवा त्यांची गैरसोय झाली असती”, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वत्त टाइम्स नॉऊने दिलं आहे.
रॉबर्ट वाड्रा काय म्हणाले?
“जर आपण महाकुंभमेळ्याला गेलो तर व्हीआयपी व्यवस्था असल्याने त्या ठिकाणी व्यत्यय आला असता. त्यामुळे तेथे आलेल्या यात्रेकरूंची गैरसोय झाली असती. आपण तेथे कधीही जाऊ शकतो. सार्वजनिक प्रदर्शनासाठी आपण काही करत नाही. आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याची गरज नाही. माझा असा विश्वास आहे की आपण सार्वजनिक प्रदर्शनासाठी धार्मिक कृत्ये करू नयेत किंवा दिखाव्याचं राजकारण देखील केलं नाही पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी सार्वजनिक प्रदर्शनासाठी धार्मिक भेटी घेत नाहीत. त्यांना जेव्हा वाटतं तेव्हा ते कोणत्याही पवित्र ठिकाणी जाऊ शकतात”, असंही रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तब्बल १२ वर्षांनी झालेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जवळपास ६६ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, राहुल गांधी हे या कुंभमेळ्याला न गेल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता या टीकेला रॉबर्ट वाड्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे अमित मालवीय काय म्हणाले होते?
भाजपाचे अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून ६६ कोटींहून अधिक लोकांनी श्रद्धेच्या या उत्सवात भाग घेतला होता. पण राहुल गांधींनी या महाकुंभाला भेट दिली नाही. राहुल गांधींचा हिंदूंच्या या उत्सवावर विश्वास नसणं स्वाभाविक आहे. एवढंच नाही तर राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिरालाही भेट दिलेली नाही. खरं तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण हेच राहुल गांधी त्यांची बहीण प्रियांका वाड्रा यांच्या निवडणुकीपूर्वी मंदिरांना भेट देण्याचं नाटक करतात, ते आता थांबवायला हवं”, असं म्हणत अमित मालवीय यांनी खोचक टीका केली होती.