हरीयाणातील वादग्रस्त जमिन खरेदी व्यवहार प्रकरण काँग्रेसवर पुन्हा एकदा शेकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस अध्यक्षांच्या जावयांनी ‘कागदपत्रांची अफरातफर’ करून सदर जमिनीची खरेदी केल्याचा आरोप, या खरेदी गैरव्यवहारांवर प्रकाश पाडणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक खेमका यांनी केला आहे. सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी गुरगावमध्ये ३.५३ एकर जमीन खरेदी करताना हा गैरप्रकार केला असल्याचे म्हटले आहे. तर या आरोपांचा बोलविता धनी भाजप असल्याचे टीकास्त्र काँग्रेसने सोडले आहे.
रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्यातील कराराची चौकशी करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये हरियाणा सरकारने तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली होती. त्या समितीपुढे खेमका यांनी आपले म्हणणे सादर केले.
वढेरा तसेच सचिवांवरील आरोप
वढेरा यांच्या व्यवहारांकडे हरियाणा सरकारच्या शहर नियोजन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही खेमका यांनी केला आहे. वढेरांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने ओंकारेश्वर प्रॉपर्टीकडून जमीन विकत घेतली, हे व्यवहार तसेच नगर नियोजन खात्याने दिलेला व्यापारी परवाना बोगस असल्याचा आरोप खेमका यांनी केला आहे. नोंदणी करताना शुल्क भरणा केल्याचा किंवा पैसे अदा केल्याचा उल्लेख नसेल तर वढेरांच्या कंपनीची मालकी त्या जमिनीवर कशी काय होईल, असा सवाल खेमका यांनी उपस्थित केला आहे. खेमका यांनी हा व्यवहार रद्दबातल ठरविला होता. भविष्यात पैसे देण्याचा कुठलाही वायदा करारात नव्हता, असे खेमका यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्टय़ा किंवा नैतिकदृष्टय़ा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी त्या जमिनीची मालक कशी होईल, असा सवाल खेमका यांनी आपल्या शंभर पानी अहवालात केला आहे.

Story img Loader