तरनतारन जिल्ह्यातील घटना
पीटीआय, चंडीगढ : पंजाबमधील तरनतारन या भारत-पाकिस्तान सीमा भागातील जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यावर रॉकेटद्वारे बॉम्बहल्ला ( रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड-आरपीजी) करण्यात आला. गेल्या सात महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी हा हल्ला म्हणजे भारताला हजारो जखमा करण्याची शेजारी देशाची (पाकिस्तान) रणनीती असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु सरहाली पोलीस ठाण्याजवळील इमारतीच्या खिडक्यांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यादव यांनी सांगितले, की प्राथमिक माहितीनुसार शुक्रवारी रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी महामार्गावरून हा रॉकेटहल्ला झाला. जो सरहाली पोलीस ठाण्याच्या सुविधा केंद्रावर पडला. हा लष्करी बनावटीचा बॉम्ब आहे. सीमेपलीकडून त्याची तस्करी झाली असावी, असा संशय आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दल यादव म्हणाले, भारताला हजारो जखमा करून नष्ट करण्याच्या शेजारी देशाच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व पंजाब पोलिसांच्या समन्वयाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पोलिसांनी सांगितले, की शुक्रवारी रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी हे अस्त्र डागले. अमृतसर-भटिंडा महामार्गावरील सरहाली पोलीस ठाण्यालगतच्या सुविधा केंद्रावर आदळले. तपासप्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्यात मोहाली येथील पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट हल्ला झाला होता.