Rocky Mittal Left BJP Joins Congress : प्रसिद्ध हरियाणवी गायक रॉकी मित्तल उर्फ जय भगवान मित्तल यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम केला आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रॉकी मित्तल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या खास शैलीत काँग्रेस प्रवेश केला. भर सभेत गाणं गात त्यांनी राहुल गांधी व देशाची माफी मागितली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत रॉकी मित्तल यांनी काँग्रेसशी ‘हात’ मिळवला. युथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर रॉकी मित्तल यांच्या पक्षप्रवेशाचा व त्यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

श्रीनिवास बी. व्ही. यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत रॉकी मित्तल काँग्रेसच्या मंचावर नाचत गाणं गाताना दिसत आहेत. ”यारों में अंधा था अंधभक्ति में… ठोकर मैंने खाई. राहुल मेरे भाई, मुझे माफ करना… राहुल मेरे भाई…, हैं नफरत फैलाई हमने, तू ने मिटाई, राहुल मेरे भाई, मुझे माफ करना, राहुल मेरे भाई….” असे त्यांच्या गाण्याचे बोल आहेत.

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश का केला? रॉकी मित्तल यांनी सांगितलं कारण

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार रॉकी मित्तल यांनी भाजपावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजपाने मला तुरुंगात टाकलं. माझ्याबरोबर दुर्व्यवहार केला. त्यामुळेच मी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता तुटला, काँग्रेसने व्हिडीओ पोस्ट करत विचारला खोचक प्रश्न

हरियाणामध्ये १ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक

हरियाणात १ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील सर्व ९० जागांवर या दिवशी मतदान प्रक्रिया राबवली जाईल. ४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या दिवशीच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर केला जाणार आहे. हरियाणातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात उड्या घेताना दिसत आहेत.

हे ही वाचा >> SP BSP Alliance : सपा-बसपा एकत्र येणार? भाजपाच्या मायावतींवरील टीकेला अखिलेश यादवांचं उत्तर; नव्या आघाडीची चर्चा, बसपाचेही दरवाजे खुले?

विधानसभेत अटीतटीची झुंज

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातील १० पैकी ५ जागा इंडिया आघाडीने तर ५ जागा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकही अटीतटीची होईल असं चित्र दिसत आहे. आवडत्या मतदारसंघातून तिकीट मिळावं यासाठी राज्यातील नेते पक्ष बदलताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हरियाणातील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. यामध्ये गायक रॉकी मित्तल यांची भर पडली आहे. आगामी निवडणुकीत रॉकी मित्तल काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील.

Story img Loader