पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला भारताने शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. या अभद्र टीकेद्वारे पाकिस्तानने नवी नीचतम पातळी गाठल्याची कठोर टीका भारताने केली आहे. याशिवाय भुट्टोंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवर भारतामधील राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भुट्टोंच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार म्हणाले, “पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि देशातील विविध प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी केलेली दिसतेय. याचा तीव्र निषेध. भुट्टो यांनी आपली मर्यादा सांभाळावी.”
याशिवाय, “पंतप्रधान मोदींसोबत आमचे वैचारिक मतभेद असले, तरी त्यांच्यावर केलेली टीका कोणताही विरोधी पक्ष कदापि सहन करणार नाही. वास्तविक भारतावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.”
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांत विविध दहशतवादी गटांना पाकिस्तानचा पाठिंबा अधोरेखित केला व ‘दहशतवादाचे केंद्र’ असे पाकिस्तानचे नाव न घेता वर्णन केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक हल्ला चढवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती.
हेही वाचा – “यापेक्षा आपल्या विचारांवर मास्क लावला तर…” सचिन सावंतांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
न्यूयॉर्कमध्ये भुट्टो यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, की, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांची उद्विग्नता ही दहशतवादाला देशाच्या धोरणाचा भाग बनवणाऱ्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या मुख्य सूत्रधारांवर काढायला हवी होती. पाकिस्तान हा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ‘हुतात्मा’ म्हणून गौरवतो. तसेच लखवी, हाफिज सईद, मसूद अझहर, साजिद मीर आणि दाऊद इब्राहिम सारख्या कुख्यात दहशतवाद्यांना आश्रय देतो. पाकिस्तानशिवाय इतर कोणताही देश संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेले १२६ दहशतवादी, २७ दहशतवादी गट आपल्याकडे असल्याचा अभिमान बाळगूच शकत नाही.