Rohit Sharma Fat: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने रविवारी (२ मार्च) न्यूझीलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली. आता उपांत्य फेरीत भारत वि. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. भारताच्या या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांकडून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. यातच आता काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या शरीरावर केलेली एक टिप्पणी वादाच्या केंद्रस्थानी आहे. रोहित शर्माच्या फिटनेसवरून आजवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र त्याचा त्याच्या खेळावर कधीही दुष्परिणाम दिसला नाही. पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्याला थेट ‘लठ्ठ’ खेळाडू म्हटले. तसेच कर्णधार म्हणूनही तो वाईट असल्याचे शमा मोहम्मद म्हणाल्या.
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्या टीकेनंतर आता क्रिकेट चाहते आणि भाजपाचे प्रवक्ते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. शमा मोहम्मद यांनी म्हटले होते, “रोहित शर्मा खेळाडू म्हणून खूप लठ्ठ असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.”
रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, “रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.

क्रिकेट चाहत्यांसह भाजपाने शमा मोहम्मद यांच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी क्रिकेटपटूच्या शारीरिक व्यंगावर भाष्य केले असून टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराचा अवमान केला आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्या राधिका खेरा यांनी केला. काँग्रेसकडून अनेकदा खेळाडूंचा अवमान करण्यात येतो, असेही त्या म्हणाल्या. खेरा पुढे म्हणाल्या, रोहित शर्माने भारताला विश्वचषक जिंकून दिला. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतःच्या पक्षाला विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत. तसेच खेरा यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्यावरही टीका केली. भारताची मान उंचावणाऱ्या क्रिकेटपटूंना लक्ष्य करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षाची कमी होत चाललेली विश्वासार्हता जपण्यावर लक्ष केंद्रीत करावे.

वाद होताच पोस्ट डिलीट केली
दरम्यान रोहित शर्मावरील पोस्ट नंतर वाद उद्भवल्यामुळे शमा मोहम्मद यांनी सदर पोस्ट डिलीट केली आहे. त्यानंतर त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपली भूमिका मांडली.
त्या म्हणाल्या, माझी पोस्ट अतिशय सामान्य होती. खेळाडूने फिट राहणे आवश्यक आहे. मला रोहित शर्मा थोडा लठ्ठ वाटला त्यामुळे मी ती पोस्ट टाकली होती. यावर विनाकारण वाद निर्माण केला गेला. भारतीय क्रिकेटसंघाचे याआधीचे कर्णधार कसे होते, हे पाहायला हवे. विराट कोहलीचे उदाहरण घ्या. तो फिट तर आहेच. पण आपल्या संघातील खेळाडूंना प्रतिष्ठा देण्यासाठी तो नेहमी पुढे असतो. मोहम्मद शामीवर टीका होत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता.